बांदा : गोव्याच्या मुक्तिसंग्रामात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा इतिहासात योग्य सन्मान झाला पाहिजे. गोवा मुक्तीसाठी बलिदान देणाऱ्या सर्व हुतात्म्यांची सखोल माहिती संकलित करून त्यांची नावे निश्चित करावीत. मुक्तिसंग्रामातील एकाही हुतात्म्याचे नाव इतिहासातून सुटता कामा नये, यासाठी सरकारने व्यापक संशोधन करावे, असे आवाहन केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना केले.
पत्रादेवी येथे उभारलेल्या हुतात्मा स्मृती स्मारकाचे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांनी स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून गोवा मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन केले. तसेच स्मरण, संघर्ष आणि आशेचे प्रतीक म्हणून वृक्षारोपण केले.
गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले रक्त सांडले, पोर्तुगीज राजवटीविरोधात संघर्ष केला आणि देशासाठी बलिदान दिले, अशा प्रत्येक व्यक्तीच्या योगदानाची इतिहासात नोंद झाली पाहिजे. ज्ञात तसेच अज्ञात स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्म्यांची माहिती शोधून त्यांचे योगदान पुढे आणले पाहिजे. कोणत्याही हुतात्म्याचे नाव इतिहासातून वगळले जाऊ नये, यासाठी सखोल संशोधन आणि दस्तऐवजीकरण करण्याची गरज आहे, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले. मुक्तिसंग्रामात बलिदान देणाऱ्या सर्व हुतात्म्यांची नावे कायमस्वरूपी जतन करून त्यांचे स्मरण पुढील पिढ्यांना व्हावे. त्यांच्या त्यागातून तरुणांना प्रेरणा मिळावी, यासाठी त्यांच्या योगदानाची नोंद इतिहासात ठळकपणे झाली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते गोवा मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांच्या शौर्याला समर्पित ‘गोव्याचे हुतात्मे’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकातून मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांचे देशप्रेम, शौर्य आणि बलिदान पुढे आणण्यात आले आहे.
कार्यक्रमास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खा.सदानंद शेट तानावडे, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, मत्स्योद्योगमंत्री निळकंठ हळर्णकर, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, सा. बां. मंत्री दिगंबर कामत, आ. प्रेमेंद्र विष्णू शेट, डॉ. चंद्रकांत शेट्ये, प्रवीण आर्लेकर व जित आरोलकर, गोवा शासनाचे मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदवेलू, उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकित यादव, गोवा, दमण व दीव स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष रोहिदास देसाई यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.