जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा मंदावला  
सिंधुदुर्ग

Sindhudurg Rain Update : जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा मंदावला

भातशेती करपू लागली; शेतकरी चिंतेत

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : मागील आठवड्यात मुसळधार पाऊस झाल्यानंतर गेले दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा मंदावला आहे. अधूनमधून सरी व कडक ऊन असे काहीसे वातावरण सध्या अनुभवायास येत आहे. दरम्यान भात लावणी अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र कमी झालेला पाऊस, तीव्र ऊन व दमट हवामान अशा प्रतिकूल वातावरणामुळे भातरोपे करपू लागल्याचे चित्र आहे. वातारवरण असेच राहिल्यास भातशेतीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त होत आहे.

हवामान विभागाच्या मते जुलै अखेरपर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी कसरत करतच लावणीची कामे आटोपली असली तरी आता भरडी क्षेत्रातील भातशेती करपण्याचा धोका निर्माण झाला आहे. भातशेतीच्या वाढीसाठी चांगला पाऊस होणे अपेक्षित असते, मात्र पावसाचा जोर कमी असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

मान्सूनच्या आगमनानंतर आणि त्यानंतरच्या काळात कोकणात पुरेशा प्रमाणावर पाऊस होत होता. मात्र जुलैच्या दुसऱ्या आठवड्यानंतर पावसाचा जोर कमी झाला. अरबी समुद्राकडून येणाऱ्या आद्रा वाऱ्यांची तीव्रता कमी होणे, कमी दाबाची हवामान प्रणाली महाराष्ट्राच्या बाजूने पुरेशी सक्रिय नसणे त्यामुळे मान्सून प्रवाहात खंड पडला आहे. हा खंड तात्पुरता असला तरी त्याचा थेट परिणाम भातशेतीच्या वाढीवर होण्याची शक्यता आहे. लावणी केल्यानंतर रोपांची वाढ होण्यासाठी पुरेसा पाऊस होणे अपेक्षित असते. मात्र तसा पाऊस सध्या होत नसल्याने लावणी केलेली भातशेती काही प्रमाणात धोक्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT