सावंतवाडी : एकीकडे विमान इंधन दरवाढीमुळे विमानसेवा प्रभावित झालेली असताना, दुसरीकडे तांत्रिक बिघाडांचे प्रमाण वाढल्याने प्रवासी आणि प्रशासनाला मोठा फटका बसत आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी असाच प्रकार समोर आला. जिथे पुणे ते गोवा (मोपा) मार्गावरील इंडिगोच्या विमानाला तांत्रिक बिघाडामुळे तब्बल ८ तास विलंब झाला. या विलंबामुळे संतप्त प्रवाशांनी विमानतळावर गोंधळ घातला. अखेर इंडिगो कंपनीने मुंबई विमानतळावरून खास विमान मागवून प्रवाशांना गोव्यात पोहोचवले.
सोमवारी पुणे येथून पहाटे ५ वाजून २५ मिनिटांनी गोवा-मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे टेकऑफ करणाऱ्या इंडिगोच्या विमानाला सुरुवातीलाच २० मिनिटांचा विलंब झाला. त्यातच गेट क्रमांक २ ऐवजी ऐनवेळी गेट क्रमांक ३ वरून प्रवाशांना प्रवेश देण्यात आला. या विमानात प्रवासी बसल्यानंतर एअर होस्टेसच्या सूचनेनंतर सकाळी ६ वा.च्या सुमारास विमान गोव्याकडे टेकऑफसाठी रनवेवर सुमारे ५ किलोमीटर धावले. मात्र, त्याच वेळी पायलटने विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची घोषणा केली. काही वेळ विमान रनवेवरच उभे होते आणि नंतर ते पुन्हा पार्किंगच्या ठिकाणी आणण्यात आले. तिथे आणखी अर्धा तास थांबल्यानंतर, बिघाड गंभीर असल्याचे सांगत कॅप्टनने प्रवाशांना सामानासह खाली उतरण्याच्या सूचना केल्या.
विमान खाली केल्यानंतर सर्व प्रवाशांना पुणे विमानतळावर एकत्र जमा करण्यात आले. विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांनी, मुंबईहून दुसरे विमान सकाळी ११.३० वा. येईल आणि त्यानंतर दुपारी १२.३० वा. हे विमान प्रवाशांना घेऊन गोव्याकडे उड्डाण करेल, अशी माहिती दिली. हे ऐकताच प्रवाशांचा रागाचा भडका उडाला आणि त्यांनी अधिकाऱ्यांना प्रश्नांचा भडिमार करत धारेवर धरले. 'दुसरे विमान येण्यासाठी इतका वेळ का? ११.३० ची वेळ पाळली जाईल की दुपारी २-३ वाजेपर्यंत वेळ वाढवली जाईल? आजच परतीचे तिकीट काढले असल्याने आमच्या महत्त्वाच्या मिटिंग्ज आणि कामे रद्द होणार, याचे काय?' असे सवाल प्रवाशांनी केले.
यावर स्पष्टीकरण देताना संबंधित अधिकाऱ्याने सांगितले की, पुणे विमानतळ भारतीय हवाई दलाच्या (एअरफोर्स) ताब्यात असल्याने सकाळी ९.३० ते ११.३० वा. या वेळेत येथे कोणत्याही प्रवासी विमानाला लँडिंग किंवा टेकऑफची परवानगी नसते. त्या ठिकाणी एअरफोर्स विभागाच्या विमानांचा सराव होत असतो. त्यामुळे मुंबईचे विमान ११.३० नंतरच येऊ शकत होते. तसेच ज्या प्रवाशांना तिकीट रद्द करायचे असेल किंवा दुसऱ्या विमानात जागा हवी असेल, त्यांना ती व्यवस्था करून देण्याची तयारीही कंपनीने दर्शवली.या विमानतळावर कोणतेही प्रवासी विमान वाहतूक होत नसल्याने साडे अकरा पर्यंत दुसऱ्या कंपनीचे विमान उतरू वा टेकऑफ कसे होईल? असा सवाल विचारला जाऊ लागला.
अखेर, मुंबईहून आलेले विशेष विमान सकाळी ११.४० वा. पुण्यात दाखल झाले आणि दुपारी १२.४० वा. प्रवाशांना घेऊन गोव्याकडे झेपावले. दुपारी दीड वा.च्या सुमारास हे विमान गोव्यात उतरले. पहाटेचे विमान थेट दुपारी पोहोचल्याने प्रवाशांना तब्बल ८ तासांचा मनस्ताप सहन करावा लागला.