कुडाळ : "छत्रपती शिवाजी महाराज हे सेक्युलर नव्हते तर प्रखर हिंदुत्ववादी होते आणि त्यांच्या सैन्यात मुस्लिम सैनिक होते हा इतिहास चुकीचा व सोयीस्करपणे पसरवला गेला आहे. आपला संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा हा पूर्णपणे हिंदूमय झाला पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येक हिंदूने जागरूक राहून प्रयत्न केले पाहिजेत," असे प्रतिपादन राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कुडाळ येथे केले.
शिवशंभु विचार मंच, शिवप्रेमी संघटना कोकण प्रांत सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग सह्याद्री प्रतिष्ठान, शिवप्रतिष्ठान दुर्ग मावळा प्रतिष्ठान आणि स्वराज्य सक्षमीकरण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने इतिहास संशोधक स्व. गजानन भास्कर मेहेंदळे लिखित 'औरंगजेब आणि उत्तरकालीन मुघल' या महत्त्वपूर्ण ग्रंथरुपी पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा कुडाळ येथील सभागृहात पार पडला. या प्रसंगी पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्याला व्यासपीठावर राष्ट्रीय संयोजक सुधीर थोरात, भूषण साटम, कुडाळच्या नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, रमा नाईक यांच्यासह अनेक इतिहासप्रेमी आणि संघटनांचे प्रतिनिधी प्रमुख उपस्थित होते.
प्रकाशन सोहळ्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, ‘काही लोक छत्रपती शिवाजी महाराज हे सेक्युलर होते असा चुकीचा प्रचार करतात, परंतु वस्तुस्थिती तशी नाही. मुघल राजवटीत हिंदू समाजावर आणि मंदिरांवर होणाऱ्या अतोनात अन्यायाविरुद्ध लढण्यासाठीच मां जिजाऊंच्या आशीर्वादाने महाराजांनी 'हिंदवी स्वराज्याची' स्थापना केली. शिवरायांचा हा ज्वलंत इतिहास प्रत्येक हिंदूने वाचला पाहिजे.’
सैन्यदलातील रचनेबाबत बोलताना राणे यांनी इतिहास संशोधक स्व. गजानन मेहेंदळे यांच्या अभ्यासाचा दाखला दिला. ते म्हणाले, ‘महाराजांच्या सैन्यात एकही मुस्लिम सैनिक नव्हता, हे मेहेंदळे यांनी पुराव्यानिशी लिहून ठेवले आहे. जर स्वराज्याची लढाई ही धर्म आणि संस्कृती रक्षणासाठी मुघलशाहीविरुद्ध होती, तर सैन्यात मुस्लिम भरती करण्याचा प्रश्नच येत नाही.
सेक्युलर प्रतिमेचा दावा करणाऱ्यांनी हे उत्तर द्यावे की, जर मुस्लिम सैन्यात होते, तर छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचे पण राजा होते असा अर्थ होतो मग असे असताना आज एका तरी मशिदीवर किंवा मिरवणुकीत शिवजयंती साजरी करताना किंवा शिवरायांचा जयघोष करताना कोणी का दिसत नाही? हे उत्तर तथाकथित सेक्युलरवाद्यांनी दिले पाहिजे.’
'गड-किल्ल्यांचे जिहादीकरण रोखणे हे आपले कर्तव्य'
गड-किल्ल्यांच्या संवर्धनावर बोलताना त्यांनी चिंता व्यक्त केली. "गड-किल्ले ही आपली मंदिरे आहेत. त्याकडे पाहिल्यावर आपल्याला आपल्या राजाचा ज्वलंत इतिहास दिसतो. मात्र, विशाळगडासारख्या ठिकाणी हिरव्या चादरी टाकून, मजारी आणि मशिदी उभारून गड-किल्ल्यांचे इस्लामीकरण व जिहादीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा इतिहास पुसण्याचा डाव असून शिवप्रेमींनी आपल्या गड-किल्ल्यांचे पावित्र्य टिकवण्यासाठी एकत्र आले पाहिजे.’
बाजारपेठेतील व्यवहारांवर भाष्य करताना त्यांनी हिंदूंनी आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या सतर्क राहण्याचे आवाहन केले. बाजारात फळे किंवा सेवा खरेदी करताना आपण कोणाकडून खरेदी करत आहोत आणि त्यामागे काय पद्धती वापरल्या जातात, याचे भान ठेवले पाहिजे. या देशाचे इस्लामीकरण करण्याच्या अजेंड्याला आपल्याला छेद द्यायचा आहे.
आपल्या राजकीय भूमिकेविषयी स्पष्टपणे बोलताना पालकमंत्री म्हणाले, ‘मी आमदार किंवा मंत्री पदावर पाच-पाच वर्षांसाठी आहे. पण माझी मूळ आणि कायमस्वरूपी ओळख ही 'हिंदू' हीच आहे. माझ्या जन्म दाखल्यावर किंवा मृत्यू दाखल्यावर पालकमंत्री लिहीले जाणार नाही, तर नितेश राणे हा 'हिंदू' होता हीच ओळख कायम राहील. असे सांगितले. निवेदन संजय शिंदे यांनी केले. या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यास कुडाळ शहर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शिवप्रेमी, हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, इतिहास अभ्यासक आणि नागरिक उपस्थित होते.