खरचं प्रमोद जठार कुठे आहेत?... इकडे-तिकडे, मागे-पुढे, वर-खाली सगळीकडे भाजपच्या सत्तेचा प्रवाह तुडुंब भरून वाहतो आहेे. या प्रवाहात जठार मात्र कुठे दिसत नाहीत. एका डिजिटल चॅनेलच्या पत्रकाराने जठार यांच्याशी संपर्क करत त्यांची खुशाली विचारली... तेव्हा जठार म्हणाले, ‘टायगर अभी जिंदा है! कोणत्याही व्यक्तीला राजकारण नुसतं बाहेरून चिकटत नाही, ते आतमध्ये खोलवर पाझरतं. जठार तर विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आलेले, भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलेले, आता लोकसभा प्रवास योजनेचे नेतृत्व केलेले. ते कसे काय राजकारणापासून दूर राहू शकतात?
‘मी 40 वर्षे मुंबईत राहिलो, धन कमावले, आता मला माझ्या मायभूमीत गाडून घ्यायचे आहे... इथेच पुन्हा अंकुर म्हणून उगवायचे आहे... माझ्या भूमीची सेवा करायची आहे... असं मन मोकळं करत 17 वर्षांपूर्वी कणकवलीत येवून त्यांची रणशिंग फुंकलं. खरेच 2009 सालच्या विधानसभा निवडणुकीत कणकवली, देवगड, वैभववाडी या तालुक्यांचा समावेश असलेल्या कणकवली मतदारसंघात निवडून येवून ते या मतदारसंघाचे पहिले आमदार बनले. भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले. भाजपचे नेते म्हणून सक्रिय राहिले. मध्ये लोकसभा निवडणुकीत उतरण्याची तयारी ते करत होते. रत्नागिरीमध्ये ते जास्त अॅक्टिव्ह होते. या मतदार संघाचे ते लोकसभा प्रवास योजनेचे प्रमुख होते. विद्यमान खासदार नारायण राणे यांना जरी उमेदवारी मिळाली तरी त्यांनी काम केले. अगदी अलीकडच्या विधानसभा निवडणुकीतही ते प्रचारात दिसले. भाजप सत्तेवर आला... प्रधानमंत्री... मुख्यमंत्री...पालकमंत्री भाजपचे बनले. परंतु गेल्या अडीच महिन्यांत जठार मात्र कुठे दिसले नाहीत.
मंत्र्यांचे स्वागत, भाजपा सदस्य नोंदणी सभा, प्रवेश कार्यक्रम, भूमिपूजने, उद्घाटने, यात कुठेही जठार यांचे दर्शन झाले नाही. लोकांमध्येही चर्चा सुरू झाली. एका पत्रकाराने जेव्हा संपर्क साधला तेव्हा मात्र जठारांनी ‘टायगर अभी जिंदा है!’ असा डायलॉग ऐकवत ‘टेन्शन नही लेने का?’ असेही सांगून टाकले. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्यात पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून चांगलं काम सुरु आहे. निवडणूक आली की मी येणार आहेच. सध्या रत्नागिरी, चिपळूण भागात आहे. संपूर्ण लोकसभा मतदारसंघात आपलं कार्यक्षेत्र आहे. पक्ष मोठा झाला आहे याचा आनंद आहे, असे सांगत जठार यांनी एक सुंदर कविताही ऐकवली... ‘असू आम्ही सुखाने, पत्थर पायातील...मंदिर उभविले, हेच आमचे शिल’. या चार ओळीतूनच जठार यांनी पक्षाप्रती समर्पण व्यक्त केले. शेवटी त्यांनी हेही सांगितले की, ‘आम्ही संघाचे कार्यकर्ते आहोत, त्यामुळे आम्हाला काही मिळायला पाहिजे असा काही आग्रह नाही’. शेवटी त्यांनी सिंधुदुर्गातील जनतेला शुभेच्छाही दिल्या.
हा ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काय आहेत प्रमोद जठार यांच्या भावना? जठार हे एक असे राजकीय व्यक्तिमत्त्व आहे की, त्यांनी राजकारणात काम करताना सतत विचारांच गाठोडं उराशी बाळगलं. तसं अख्ख जग वेगाने बदलतंय. राजकारणही पार बदलून गेलंय. अशा राजकारणात गर्दीत चालताना जठार यांना आपल्या विचारांच्या गाठोड्याला धक्के बसतील अशी भीती सतावत असावी. पण अशाही परिस्थितीत आपलं गाठोडं सुरक्षित घट्ट पकडून ठेवून बदलत्या राजकारणाशी मिळतजुळत घेत वाटचाल करणारेच पुढे जात असतात. जठार यांनाही तशीच वाटचाल करावी लागेल. हेही खरे आहे... एखादा राजकीय पक्ष चोहोबाजूंनी पॉवर पार्टी बनतो तेव्हा अनेकजण मुख्य प्रवाहापासून दूर जातात. हा दोष पक्षाचा नसतो. सत्तेच्या तुडुंब प्रवाहात पोहण्याची सवयही करून घ्यावी लागते. विचारांचं गाठोड घट्ट पकडून जनहित साधण्यासाठी सतत अॅक्शन मोडवर राहणे हीच राजकारणाची प्रकृती आणि प्रवृत्ती आहे, ती जोपासायलाच हवी. प्रमोद जठार हे एक राजकीय व्यक्तिमत्त्व आहे. सिंधुदुर्गातील समाजजीवनाशी त्यांचे नाते आहे. सिंधुदुर्गाच्या वाटचालीत ते कैक वर्षे सक्रिय आहेत. त्यांना राजकारणपासून दूर राहून कसे चालेल?
प्रमोद जठार आणि कवितेचं नातं तसं घट्ट आहे. राजकारणात यशाच्या शिखरावर असतानाही अनेक साहित्यिक, कवी, गझलकार, पत्रकार यांना एकत्र करून मैफल रंगवणे हा तसा त्यांचा आवडीचा विषय. आताही त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना कविताच सादर केली. पक्ष कितीही मोठा झाला तरी आपण त्या यशाच्या इमारतीच्या पायातील दगड आहोत हा विचार त्यांनी चार ओळीतून व्यक्त केला आहे. जठार यांची भविष्यातील राजकीय वाटचाल कशी असेल हेही तसे औत्सुक्याचे आहे.