कुडाळ : पुढारी वृत्तसेवा; कुडाळ तालुक्यातील चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर खून प्रकरणातील सहावा आरोपी गौरव वराडकर (सातार्डा, ता. सावंतवाडी) याने प्रकाशच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी संशयित आरोपींना मदत केली. याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी उशिरा संशयिताला अटक करून शनिवारी कुडाळ न्यायालयात हजर केले. तसेच याच गुन्ह्यातील गणेश नार्वेकर वगळता अन्य चार संशयितांना पुन्हा कुडाळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्व पाचही आरोपींना तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली.
प्रकाश बिडवलकर खून प्रकरणातील सिद्धेश शिरसाट (रा. कुडाळ), अमोल शिरसाट (रा. कुडाळ), सर्वेश केरकर (सातार्डा), गणेश नार्वेकर (माणगाव) आणि अनिकेत गावडे (रा. पिंगुळी) या पाचही जणांना पोलिस कोठडी आणि त्यानंतर न्यायालयाने पोलिस कोठडी अबाधित राखून न्यायालयीन कोठडी दिली होती.
दरम्यान, या प्रकरणातील सहावा आरोपी गौरव वराडकर याने प्रकाश बिडवलकरच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी संशयित आरोपींना मदत केल्याप्रकरणी शुक्रवारी उशिरा पोलिसांनी गौरव वराडकरला अटक केली. त्याला शनिवारी कुडाळ न्यायालयात हजर केले. तसेच या प्रकरणातील अन्य पाच संशयित आरोपी पैकी गणेश नार्वेकर वगळता अन्य सिद्धेश शिरसाट (रा.कुडाळ), अमोल शिरसाट (रा. कुडाळ), सर्वेश केरकर(सातार्डा) आणि अनिकेत गावडे (रा.पिंगुळी) या चार जणांना शनिवारी पुन्हा न्यायालयात हजर केले.
यावेळी तपास अधिकारी कांबळे यांनी संशयित आरोपी क्रमांक एक सिद्धेश शिरसाट व मृत प्रकाश बिडवलकर या दोघांचे मोबाईल हस्तगत करावयाचे आहेत तसेच या प्रकरणात अन्य दोन गाड्या वापरण्यात आलेल्या आहेत, त्या दोन्ही गाड्या आम्हाला ताब्यात घ्यावयाच्या आहेत. त्यामुळे संशयित आरोपींना सात दिवस पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली. यावेळी न्यायालयाने संशयित पाचही आरोपींना दि.२२ एप्रिल पर्यंत म्हणजेच तीन दिवस पोलिस कोठडी दिली. आरोपीच्या वतीने ॲड. विवेक मांडकुलकर व ॲड. संजीव प्रभू यांनी बाजू मांडली तर सरकारी पक्षाच्या वतीने श्रीमती पाटील यांनी युक्तिवाद केला, अशी माहिती तपास अधिकारी निवती पोलिस स्थानकाचे पोलिस अधिकारी गायकवाड यांनी दिली.