कुडाळ : कुडाळ शहरातील उद्यमनगर ते एसआरएम कॉलेज चौक रस्त्याचे काँक्रिटीकरण निकृष्ट करण्यात आल्याचा आरोप वाहनचालक व नागरिकांनी केला आहे. अवघ्या काही महिन्यांच्या आत या काँक्रीटीकरणाला अनेक ठिकाणी तडे गेले असून काही ठिकाणी हे काँक्रीटीकरण उखडले आहे. त्यामुळे या मार्गावर पुन्हा खड्डे पडण्याची शक्यता असून या कामाची चौकशी व तपासणी करावी, अशी मागणी वाहनचालकांमधून करण्यात येत आहे.
कुडाळ-उद्यमनगर रस्ता हा गटार नसल्याने वारंवार पाडणार्या खड्ड्यांसाठी दरवर्षी वारंवार चर्चेत येत असे. याबाबत अनेकवेळा आवाज उठविल्यानंतर व वाहनचालकांचा रोष लक्षात घेऊन हा रस्ता काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. या नंतर प्रशासनाने या रस्त्याचे अखेर काँक्रिटीकरण काही महिन्यापूर्वी पूर्ण केले.
यामुळे रस्त्याची उंची वाढली असून येथून आता खड्डे मुक्त व सुलभ प्रवास होण्याचा आनंद वाहनचालकांनी व्यक्त केला होता. मात्र वाहनचालकांचा हा अंदाज औट घटकेचे समाधान ठरण्याची शक्यता आहे. या रस्त्याचे काम निकृष्ट करण्यात आल्याचा आरोप नागरिक व वाहनचालकांनी केला आहे.
या नवीन रस्त्याचे काँक्रिटीकरण अल्पावधीतच उखडून गेले आहे. काही महिन्यापूर्वी काम केलेल्या या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा वरचा थर अशाप्रकारे उखडून जाणे हे काम निकृष्ट असल्याचे लक्षण आहे,असे नागरिक व वाहनधारकांचे म्हणणे आहे. तसेच रस्त्याच्या काँक्रीटीकरणाला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. त्यामुळे अल्पावधीतच हा रस्ता पुन्हा खराब होण्याची शक्यता नागरिकांनी वर्तवली आहे.
या रस्त्याच्या डागडुजीसाठी आतापर्यंत लाखो रुपये खर्ची घालण्यात आले आहेत. यानंतर लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही केलेल्या नवीन कामाची अल्पावधीतच अशाप्रकारे वाताहात होत असेल तर ते चुकीचे आहे. कोणत्याही शासकीय कामावर लक्ष ठेवण्यासाठी एखाद्या तज्ञ अभियंत्याची नियुक्ती केली जाते. असे असतानाही अशाप्रकारे निकृष्ट काम कसे होते असेही अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा रस्ता किती पावसाळे टिकेल हे सांगता येत नसून या कामाच्या गुणवत्तेची तपासणी करून याबाबत योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांनी व वाहनधारकांनी केली आहे.