पर्यटन गाव आंबोलीतील रस्त्यांची दुरवस्था 
सिंधुदुर्ग

Sindhudurg : पर्यटन गाव आंबोलीतील रस्त्यांची दुरवस्था

पर्यटकांबरोबरच व्यवसायिकांमधूनही नाराजी; लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष

पुढारी वृत्तसेवा
निर्णय राऊत

आंबोली : जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या आंबोलीतील विविध पर्यटनस्थळाना जोडणार्‍या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून याबाबत पर्यटकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. याचा फटका आंबोलीच्या पर्यटन व्यवसायाला बसण्याची भीती आहे. दरम्यान राजकीय पुढार्‍यांकडून आंबोलीच्या पर्यटन विकासाबाबत केवळ नवनवीन आश्वासने दिली जातात, प्रत्यक्षात आंबोलीच्या पर्यटन स्थळांची व अंतर्गत रस्त्यांची दयनीय ह अवस्था होत असताना हे पुढारी त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिक व व्यवसायिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

जैवविविधतेने परिपूर्ण आंबोली पर्यटनस्थळाची अवस्था अतिशय दयनीय झाल्याने त्याचा थेट फटका येथील पर्यटनाला बसत आहे. या दुरसवस्थेमुळे अनेक पर्यटक आंबोलीकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे. याचा मोठा परिणाम आंबोलीच्या पर्यटनव्यवसायावर होत आहे. पावसाळी पर्यटन हा आंबोलीचा मुख्य पर्यटन हंगाम असतो. अन्य पर्यटन हंगामातही हजारो पर्यटक आंबोलीला भेट देतात. मात्र, आंबोलीत आजही पर्यटनदृष्ट्या अनेक मूलभूत सुविधांचा अभाव आहे. परिसरातील अतिशय महत्त्वाच्या पर्यटनस्थळांवर जाणारे रस्ते देखील सुस्थितीत करायल सरकारला जमलेले नाही. स्थानिक राजकीय लोकप्रतिनिधी तर निवडणुकीपुरते आंबोली पर्यटन विकासाच्या घोषणांचा पाऊस पाडतात. मात्र त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही. यंदा सिंधुरत्न योजनेतून काही अंतर्गत रस्त्यांची डागडुजी करण्यात आली खरी पण या मलमपट्टी कामांचा दर्जा पावसाने उघड केला.

अनेक पर्यटनस्थळांवर जाणारे रस्ते पूर्णतः उखडून गेले आहेत. त्यामुळे पर्यटनस्थळांवर जाताना पर्यटकांना कसरत करत जावे लागते. पर्यटनस्थळांवरील फुटपाथांची देखील दुरवस्था झाली आहे. यामुळे लहान-मोठे अपघातही होत असतात. हिरण्यकेशी तीर्थक्षेत्राला जोडणारा रस्ता पार उखडून गेल्याने खड्डयांचे साम्राज्य पसरले आहे. तेथे वाहनाने पोहोचणे देखील कठिण झाले असून, परिणामी वाहने अडकून पडतात. अनेक वेळा या मार्गावर वाहतूक कोंडीची समस्यां निर्माण होते. हे चित्र गेले 2 ते 3 वर्ष जैसे थे आहे. सर्वच पर्यटनस्थळांचे रस्ते अरुंद असून ते ठिक ठिकाणी खचले आहेत. तर या रस्त्यांच्या मजबूतीकरणासह डांबरीकरण व त्यांचे रुंदीकरण होने आवश्यक आहे. मात्र, प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. पर्यटनस्थळांवरील अनेक रस्त्यांवरून दोन लहान गाड्या सुद्धा एकाचवेळी जाऊ शकत नाहीत. परिणामी अपघातांसह पर्यटकांमधे वारंवार वाद होतात. त्यामुळे शासनाने पर्यटनस्थळांवरील रस्त्यांचे मजबूतीकरणसह डांबरिकरण व रुंदीकरण करण्याची मागणी स्थानिकांसह सर्वच पर्यटक हे करतात.

मात्र, शासनासह स्थानिक लोकप्रतिनिधी तथा पुढारी यांनी पूर्णतः दुर्लक्ष केलेले असल्याने त्याचा थेट फटका हा आंबोलीच्या पर्यटनावर बसला आहे. तर आक्रमक मागणी नंतर महादेवगड पॉइंट रस्त्याचे डांबरीकरण झाले पण तेही उखडलेले! तर कावळेसाद पॉइंटचा रस्त्याचे काम सुरू आहे. परिणामी सद्या पर्यटनस्थळाची अवस्था अतिशय दयनीय झालेली असल्याने त्याचा थेट फटका हा येथील पर्यटनावर बसला असून सद्या पर्यटकांनी आंबोलीला पूर्णतः नाकारलेले दिसत आहेत. असेच चित्र येथे आहे. त्यामुळे येथील पर्यटनव्यवसायावरही मोठा परिणाम झालेला दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT