कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वृक्षतोड आणि जंगलांच्या ऱ्हासाचा प्रश्न गंभीर होत असतानाच पिंगुळी येथील पादर पाझर तलावाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तलावाच्या कडेला तब्बल २७५ भूखंडांची प्लॉटिंग करून, तलाव सुका असल्याचे भासवून त्यांची विक्री केली जात असल्याचा आरोप माजी आ. वैभव नाईक आणि परशुराम उपरकर यांनी केला. या प्रकारामुळे भविष्यात परिसरात पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त करत त्यांनी पिंगुळी ग्रामस्थांच्या सोमवारपासून कुडाळ प्रांताधिकारी कार्यालयासमोर होणाऱ्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा जाहीर केला.
कुडाळ एमआयडीसी येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेसचे कुडाळ तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, बाबल गावडे, विजय प्रभू आदी उपस्थित होते.
वैभव नाईक म्हणाले, पादर पाझर तलावावर परिसरातील सुमारे १ हजार ८५० नळधारक अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत तलावाच्या कडेला २७५ भूखंडांची प्लॉटिंग करून त्यांची विक्री करण्याचा प्रकार गंभीर आहे. या प्लॉटिंगमुळे तलावाचे अस्तित्व धोक्यात येऊन भविष्यात परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागू शकते. या संपूर्ण प्रकरणाची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन कारवाई करावी.
पाझर तलावाचे रेखांकन (मॅपिंग) रद्द करून तलाव सुरक्षित करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीसाठी २ नोव्हें. पासून कुडाळ प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात येणार आहे. तलावाचे रेखांकन रद्द होऊन तलावाचे अस्तित्व सुरक्षित होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील. या लढ्याला राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडीतील घटक पक्षांसह विविध राजकीय पक्षांचा पाठिंबा राहणार असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले.
माजी आ.परशुराम उपरकर यांनीही या प्रकरणावरून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, हा पाझर तलाव धरण कायदा आणि सुरक्षा कायद्याच्या कक्षेत येणारा कुडाळ तालुक्यातील एकमेव तलाव आहे. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा तलाव नष्ट होण्याची भीती आहे.सामान्य शेतकऱ्याला घर बांधायचे असल्यास स्थळपाहणी, पोलीस पाटलांचा दाखला, सरपंचांची परवानगी अशा अनेक अटींची पूर्तता करावी लागते. मग तलावाच्या इतक्या जवळ मोठ्या प्रमाणावर प्लॉटिंग करण्यास परवानगी कशी मिळते?असा सवाल उपरकर यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार जिल्हाध्यक्ष अमित सामंत आणि काँग्रेसचे कुडाळ तालुकाध्यक्ष अभय शिरसाट यांनीही आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शविला.