मालवण: 'खोटे बोला आणि रेटून बोला’, जनतेची दिशाभूल करणे हाच उद्योग मालवण शहरात उबाठा गटाकडून सुरू आहे. आता धामापूर नळपाणी योजनेच्या पाण्याच्या टाकीचा मुद्दा पुढे करून महेश जावकर जनतेची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. मात्र, नव्याने उभारण्यात येणाऱ्या नळपाणी योजनेच्या माध्यमातून राजकोट परिसरासह संपूर्ण मालवण शहरातील उच्च दाबाने मुबलक पाणीपुरवठा व्हावा, यासाठी नगरपरिषद कटिबद्ध असून, त्यादृष्टीने नियोजनबद्ध कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती मालवण न. प. चे बांधकाम सभापती सहदेव बापार्डेकर यांनी दिली.
धामापूर नळपाणी योजनेच्या प्रस्तावित पाण्याच्या टाकीच्या जागेवरून महेश जावकर यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर देताना बापार्डेकर म्हणाले, जावकर आणि उबाठा गटामध्ये विकास करण्याची क्षमता नाही, म्हणूनच जनतेने त्यांना निवडणुकीत पराभूत केले. त्यामुळे विकासकामांवर निराधार आरोप करण्यापेक्षा त्यांनी आपल्या पराभवाचे आत्मचिंतन करावे.
राजकोट परिसरातील प्रत्येक नागरिकाला उच्च दाबाने आणि मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी उंच ठिकाणी पाण्याची टाकी उभारण्याचे नियोजन आहे. त्याचप्रमाणे मालवण शहरातील विविध भागांनाही स्वतंत्र जलवाहिन्यांच्या माध्यमातून सुरळीत आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा व्हावा, यासाठी आ.नीलेश राणे यांच्या नेतृत्वात नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष आणि आम्ही सर्व नगरसेवक प्रयत्नशील आहोत. प्रशासन आणि संबंधित यंत्रणेमार्फत आवश्यक सर्वेक्षण करून कुंभारमाठ येथील उंच भागातील जागा पाण्याच्या टाकीसाठी निश्चित करण्यात येत आहे. या प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळण्यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव सादर करण्याची कार्यवाही सुरू आहे. मात्र तांत्रिक बाबींची माहिती न घेता महेश जावकर न. प. प्रशासनावी बिनबुडाचे आरोप करत असल्याचा दावा बापर्डेकर यांनी केला.