Pitru Paksha mahalaya paksha 2026 start and end date
आडेली : विवेक गोगटे
गणेशोत्सवानंतर आता जिल्हावासीयांना २७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या पितृपक्षाचे वेध लागले असून अद्याप गणेशोत्साचे काही दिवस शिल्लक असले तरी समस्त यजमान वर्गाकडून आपल्या वडिलांच्या तिथीनुसार महालय श्राद्ध करण्यासाठी पुरोहितांना निमंत्रण देण्यास सुरुवात झाली आहे.
आपण जशी सर्व धार्मिक कृत्ये करावी हा एक संकेत आहे, तसेच दिवंगत व्यक्तींचीही आठवण म्हणून त्यांचे आपल्यावर व आपल्या मुलाबाळांवर आशीर्वाद असावेत म्हणून श्राद्ध प्रत्येक घरांमधून व्हावे हा संकेत आहे. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा म्हणजेच २७ सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू होत असून सर्वपित्री अमावास्येपर्यंत आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण करून महालय श्राद्ध करावे असे शास्त्रवचन आहे.
महालयश्राद्ध विधीत आपल्या वडील, आजोबा, पणजोबा, आई, आजी, पणजी व आपल्या गोत्रातील ज्ञात-अज्ञात अशा सर्वांचे पिंड रूपाने पूजन केले जाते. या पितृपक्षात यमलोकांत आपले मृत पूर्वज आपल्या कुटुंबीयांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात अशी लोकांची श्रद्धा असल्याने या पितृपक्षात तिथीनुसार पिंड प्रदान करून वडील, आजोबा, पणजोबांच्या नावे आपल्या ज्ञातीतील जेवणकार जोडी, दाम्पत्य, निमा, नीमि, सुवासिनी, आकवारीण यांना निमंत्रण देऊन पितरांच्या नावाने महाप्रसाद वाढला जातो.
बोलावण्यात आलेले पितर नातेवाईक व ग्रामस्थ त्यांना यथोचित भोजन देऊन तृप्त केल्यास वर्षभर आपल्या कामांना गती मिळते अशीही लोकांची श्रद्धा आहे. महालय श्राद्ध, भरणी श्राद्ध, नवमी तिथी मिळवणे, निर्वंशी महालय आदी धार्मिक विधींसाठी गावातील पुरोहितांना आतापासूनच निमंत्रण देण्यास सुरुवात झाली आहे. गणेशोत्सवानिमित्त आलेले अनेक मुंबईकर चाकरमानी महालय श्राद्ध विधी करूनच परतणार असल्याने त्यांची त्या दृष्टीने तयारी सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.
महालय श्राद्ध तारखा
२७ सप्टेंबर रोजी प्रतिपदा श्राद्ध, २८ सप्टेंबर रोजी द्वितीय श्राद्ध, २९ सप्टेंबर रोजी तृतीय श्राद्ध, भरणी श्राद्ध, ३० सप्टेंबर रोजी चतुर्थी श्राद्ध व पंचमी श्राद्ध, १ ऑक्टोबर षष्ठी श्राद्ध, २ ऑक्टोबर सप्तमी श्राद्ध, ३ ऑक्टोबर अष्टमी श्राद्ध, ४ ऑक्टोबर नवमी श्राद्ध, ५ ऑक्टोबर दशमी श्राद्ध, ६ ऑक्टोबर एकादशी श्राद्ध, ७ ऑक्टोबर द्वादशी श्राद्ध, ८ ऑक्टोबर त्रयोदशी श्राद्ध, ९ ऑक्टोबर चतुर्दशी श्राद्ध, व १० ऑक्टोबर रोजी सर्वपित्री-अमावस्या श्राद्ध, (पौर्णिमेचा महालय सप्टेंबर २९, ऑक्टोबर-२,३,७,१० यापैकी कोणत्याही दिवशी करावा)
अविधवा नवमी...
भाद्रपद नवमीला अविधवा नवमी म्हणतात. या दिवशी अहेवपणी (नवरा जिवंत असताना) मृत झालेल्या स्त्रीचे श्राद्ध करण्याचा किंवा सुवासिनीला भोजन घालण्याचा प्रघात आहे.
मातामह श्राद्ध (दौहित्र)...
पिता जिवंत असताना मुलाने करावयाचे आईच्या वडिलांचे श्राद्ध. श्राद्धकर्ता तीन वर्षांच्या पुढील वयाचा झाल्यावर मुंज झालेली नसली तरीही त्यास हे श्राद्ध करता येते. माताहांच्या (आजोबांच्या) वर्षश्राद्धा पूर्वी मात्र हे श्राद्ध करता येत नाही. मातामहांसाठी (आजोबांसाठी) नातवाने म्हणजे मुलीच्या मुलाने या दिवशी ब्राह्मणाला देण्याकरिता देवापुढे दक्षिणा काढून ठेवायची पद्धत आहे. काही ठिकाणी या दिवशी त्यानिमित्त ब्राह्मणाला बोलावून दूध केळे व दक्षिणा देतात. हे फक्त आश्विन शुद्ध प्रतिपदेला करता येते म्हणजेच यावर्षी ११ ऑक्टोबर घटस्थापने दिवशी माता मातामह श्राद्ध होणार आहे.