कुडाळ : पिंगुळी-पाट मार्गावर पिंगुळी-भूपकरवाडी येथे कौल फॅक्टरी नजीक रस्त्यालगत उभ्या वॅगनार कारला मोटारसायकलने जोरदार धडक दिली. यात मोटारसायकलस्वारासह दोघेजण जखमी झाले. यातील मोटारसायकलवर मागे बसलेल्या व्यक्तीला गंभीर दुखापत झाली असून त्याला कुडाळ येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बांबोळी-गोवा येथे हलविण्यात आले आहे.
हा अपघात रविवारी मध्यरात्री 2 वा. झाला. पिंगुळी-पाट मार्गावरील भूपकरवाडी कौल फॅक्टरी नजीक रस्त्यानजीक वॅगनार कार उभी होती. रविवारी रात्री पाटहून दोघेजण मोटरसायकलने कुडाळच्या दिशेने येत होते. दरम्यान मोटारसायकलस्वाराचा ताबा सुटला आणि मोटारसायकलची उभ्या वॅगनार कारला जोरदार धडकली.
ही धडक एवढी जबरदस्त होती की, मोटरसायकलच्या मागे बसलेला सहकारी वॅगनार कारवर उंच उडाला आणि पुढे जाऊन रस्त्यावर पडला. तर मोटारसायकलस्वारही मोटारसायकलसह रस्त्यावर पडला. यात दोघांनाही दुखापत झाली. मोटारसायकलची कारला धडक बसताच मोठा आवाज झाल्याने, स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली असता अपघात झाल्याचे निदर्शनास आले.
दोन्ही जखमींना कुडाळ येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे दोघांवर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी मोटारसायकलस्वाराला सिंधुदुर्गनगरी येथील रूग्णालयात तर त्याच्या मागे बसलेल्या सहकार्याला गोवा- बांबोळी रूग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेत दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.