सावंतवाडी ः सावंतवाडी तालुक्यातील डुक्कर चोरीप्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या संशयीत प्रथमेश गुरुदेव सावंत व आर्यन अमित सुभेदार या दोघांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना वेत्ये-नमसवाडी येथील वराह पालन प्रकल्पातील 60 डुक्कर चोरीच्या दुसर्या गुन्हयात सावंतवाडी पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतले आहे. ही चोरी गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात झाली होती.
सावंतवाडी तालुक्यातील डुक्कर,सेंट्रींग प्लेट,मंदिरातील घंटा व भुरटया चोर्या करणार्या युवकांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून पकडले होते. या गुन्हयांमध्ये सावंतवाडी शहरातील जास्त युवकांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग या तीन तालुक्यात अशा चोर्या झाल्या आहेत. सावंतवाडी -कारिवडे येथील सेबेस्टीन डिसोजा यांच्या वराह पालन केंद्रातील 42 डुकरांची चोरी करुन ती गडहिंग्लज येथे विकल्याची कबुली प्रथमेश गुरुदेव सावंत व आर्यन अमित सुभेदार (रा.सावंतवाडी) या दोघांनी दिली आहे.त्यांच्यावर सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यांना या गुन्हयात एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली होती.
पोलिसांनी केलेल्या तपासात संशयितांनी बर्याच चोरींची कबुली दिली आहे. या दोघांचीही पोलिस कोठडीची मुदत गुरुवारी संपल्याने त्यांना सायंकाळी पुन्हा न्यायालयात हजर केले असता सावंतवाडी पोलिसांनी वेत्ये-नमसवाडी येथील दुसर्या डुक्कर चोरीच्या गुन्हयात संशयितांना तपासासाठी ताब्यात देण्याची मागणी केली. वेत्ये- नमसवाडी येथील फिर्यादी महेश गावडे यांचे वराह पालन प्रकल्प आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात 60 डुक्कर अज्ञात चोरटयांनी चोरली होती. त्यांची किंमत 5 लाख 76 हजार एवढी आहे.
याप्रकरणी पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार देण्यात आली आहे.तर अज्ञातांवर गुन्हा दाखल आहे. कारिवडे डुक्कर चोरीप्रकरणी ताब्यात असलेले संशयित यांचा वेत्ये येथील डुक्कर चोरीच्या गुन्हयातही सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. तर या चोरीत अन्य संशयित युवकांचाही सहभाग आहे. त्यामुळे त्यांना दुसर्या गुन्हयात ताब्यात देण्याची विनंती तपासी अमंलदार श्री.धोत्रे यांनी केली. त्यानुसार कोठडीतील दोन्ही संशयितांना वेत्ये येथील वराह चोरीप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.चोरीत वापरलेली वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत.अधिक तपास सहा.पोलिस निरीक्षक संजय कातिवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस महेश धोत्रे करीत आहेत.