सोनाळी : येथे रस्त्यावर आलेली झाडी.  
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : झाडी व खड्ड्यांमुळे फोंडाघाट-वैभववाडी राज्यमार्ग वाहतुकीस धोकादायक

अपघाताची शक्यता वाढल्याने स्थानिक नागरिक आणि प्रवाशांतून संताप

पुढारी वृत्तसेवा

मारूती कांबळे

वैभववाडी : फोंडाघाट-वैभववाडी-उंबर्डे राज्य मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा झाडी मोठ्या प्रमाणात वाढली असून, काही ठिकाणी धोकादायक अवस्थेतील झाडे रस्त्यालगत उभी आहेत. याशिवाय अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्त्यालगतची झाडी छाटून धोकादायक झाडे हटवावीत तसेच खड्डे बुजवून मार्ग सुरक्षित करावा, अशी मागणी वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

फोंडाघाट-वैभववाडी-उंबर्डे हा सुमारे २४ किलोमीटर लांबीचा राज्यमार्ग तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. चार वर्षांपूर्वी या मार्गाचे रुंदीकरण व नूतनीकरण करण्यात आले होते. त्यामुळे वाहतुकीचा वेग वाढला असून दररोज मोठ्या प्रमाणात एसटी बस, मालवाहतूक वाहने, खासगी वाहने तसेच दुचाकींची या मार्गावर वर्दळ असते.

मात्र पाऊस सुरू झाल्यापासून रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी झाडे व झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली असून यामुळे वळणांवर समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या थेट रस्त्यावर झुकल्यामुळे मोठ्या वाहनांनाही अडथळा निर्माण होत आहे. वादळी पावसाळ्यात ही झाडे अधिक धोकादायक बनली असून जोरदार वाऱ्यामुळे फांद्या तुटून रस्त्यावर पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.

याशिवाय रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी साचल्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहनांचे नुकसान होत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना याचा सर्वाधिक फटका बसत असून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक वेळा झाडी छाटणी आणि खड्डे दुरुस्तीची मागणी केली असल्याचे सांगितले. पावसाळ्यात वाहतूक सुरक्षित ठेवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT