सावंतवाडी : ‘देवराई’ म्हणून नोंद असलेल्या जागेतील जुन्या बांधकामांना दुरुस्तीसाठी तत्काळ परवानगी देण्याची घोषणा गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी केली. यामुळे अनेक घरे आणि मंदिरांना फायदा होणार आहे. तसेच सन 2015 पूर्वी शासकीय निधीतून बांधलेल्या रस्ते आणि पायवाटांची दुरुस्ती करण्यासाठी वनविभागाच्या परवानगीची गरज लागणार नाही, तसा शासन आदेश लवकरच काढला जाईल, असे ना. कदम यांनी सांगितले.
सावंतवाडी येथील आढावा बैठकीत ते बोलत होते. आ. दीपक केसरकर, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा प्रमुख संजू परब आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
गृहराज्यमंत्री कदम यांनी सांगितले, देवराई नोंद असलेल्या जागेतील जुन्या घरांच्या किंवा मंदिरांच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाने तत्काळ परवानगी देणे बंधनकारक आहे. यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ही समस्या सुटण्यास मदत होईल.
आंबोली आणि चौकुळ येथील कबुलातदार गावकर प्रश्न सोडवण्यासाठी येत्या दीड महिन्यात जमीन मोजणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश ना. कदम यांनी भूमीलेख अधिकार्यांना दिले. यासाठी इतर तालुक्यांमधून कर्मचारी बोलावून काम तातडीने मार्गी लावण्यास सांगितले.
बैठकीत आजगाव सरपंच सौ. सौदागर यांनी सरपंचांचे तुटपुंजे मानधन आणि गेल्या दोन वर्षांपासून तेही न मिळाल्याची व्यथा मांडली. तसेच, ‘स्मार्ट गाव’ योजनेत आजगावला प्रथम पारितोषिक मिळूनही 10 लाख रुपयांचे बक्षीस अद्याप मिळाले नसल्याची तक्रार त्यांनी केली.
खरेदीखत झाल्यानंतर तलाठी नोंदी घेण्यास दिरंगाई करतात, अशी तक्रार सचिन वालावलकर यांनी केली. यावर कदम यांनी खरेदी खतांची तात्काळ नोंद घेण्याचे आणि लोकांना वेठीस न धरण्याचे निर्देश महसूल विभागाला दिले. या बैठकीत उपस्थित सरपंचांनी आपल्या समस्या मांडल्या. गृहराज्यमंत्र्यांनी त्या तातडीने सोडवण्याचे आश्वासन दिले.