Sawantwadi Sateli Tree Collapse 
सिंधुदुर्ग

Sawantwadi Sateli Tree Collapse | नियतीचा क्रूर घाव! सावंतवाडीत वादळात पिंपळाचे झाड कोसळून निराधार वृद्धेचे घर जमीनदोस्त

Sawantwadi Sateli Tree Collapse | समाजातील दानशूरांना मदतीची हाक

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : पुढारी वृत्तसेवा
ऐन तारुण्यात नियतीने पतीचे छत्र हिरावून घेतल्यानंतर तब्बल ३२ वर्षे दारिद्र्याशी एकटीने झुंजणाऱ्या एका निराधार महिलेवर पुन्हा संकटाचा डोंगर कोसळला आहे. साटेली तर्फ सातार्डा (खालचीवाडी) येथील छाया पुरुषोत्तम कळंगुटकर (५५) यांच्या घरावर आठवड्यापूर्वी वादळी पावसात भलेमोठे पिंपळाचे झाड कोसळल्याने घर पूर्णतः उद्ध्वस्त झाले.

संसार उघड्यावर आल्याने या वृद्ध महिलेवर सध्या एका मोडकळीस आलेल्या पडवीत आश्रय घेण्याची वेळ आली आहे. तिच्या डोक्यावर पुन्हा छप्पर उभारण्यासाठी समाजातील दानशूरांनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पतीच्या अकाली निधनानंतर कसलाही आधार नसताना छाया कळंगुटकर या मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. पाच-सहा वर्षांपूर्वी गावातील काही संवेदनशील सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन त्यांना दारिद्र्यरेषेखालील योजनेतून एक छोटेसे घर उभे करून दिले होते. या घरात त्या एकट्याच राहत होत्या.

आठ दिवसांपूर्वी त्या आपल्या भावाकडे गेल्या असताना मध्यरात्री झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे घराशेजारील भलेमोठे पिंपळाचे झाड थेट त्यांच्या घरावर कोसळले. या दुर्घटनेत घराचे छप्पर आणि भिंती पूर्णतः जमीनदोस्त झाल्या.
मध्यरात्री मोठा आवाज झाल्याचे ऐकून शेजारी वासुदेव कळंगुटकर, उदय कळंगुटकर, हेमंत कळंगुटकर व प्रसाद कळंगुटकर यांनी धाव घेतली. सुदैवाने घरात कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, चार दिवसांपूर्वी गणेशोत्सवानिमित्त छाया कळंगुटकर गावात परतल्या तेव्हा घराची झालेली दुर्दशा पाहून त्यांना रडू कोसळले. हक्काचे घर मातीमोल झाल्याचे पाहून त्या पुरत्या हादरून गेल्या आहेत.

हाताला काम मिळाले तरच संध्याकाळची चूल पेटते, अशी हलाखीची परिस्थितीत असलेल्या श्रीमती कळंगुटकर यांच्यासमोर आता स्वतःचे घर कसे उभारायचे, याची विवंचना आहे. सध्या त्या शेजारच्या एका जुन्या पडक्या पडवीत तात्पुरता निवारा घेऊन राहत आहेत.

महसूल विभागाने घटनास्थळी येऊन पंचनामा केला असला तरी शासकीय मदत मिळण्यास मोठा कालावधी लागण्याची शक्यता आहे; शिवाय मिळणारी मदतही तोकडी असणार आहे. त्यामुळे पुन्हा सुरक्षित छप्पर उभे करण्यासाठी समाजातील संवेदनशील व दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT