नांदगाव : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या इस्लामी आतंकवादी हल्ल्यातून सहीसलामत वाचलेले तळेरे येथील पावसकर कुटुंबीयांची भेट घेत पालकमंत्री नितेश राणे यांनी सर्व सहाही जणांशी संवाद साधत तेथील परिस्थितीची व वस्तुस्थितीची माहिती घेतली. त्यांच्यासोबत डॉ. मिलिंद कुलकर्णी, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, जि.प. माजी सभापती बाळा जठार, कलाकार मानधन समिती जिल्हाध्यक्ष संतोष कानडे, सचिन पावसकर, योगेश पावसकर, सागर पावसकर, दिनेश मुद्रस, कासार्डे उपसरपंच गणेश पाताडे आदी उपस्थित होते.
तळेरे येथील तनय सचिन पावसकर, मिहीर योगेश पावसकर, ईशा योगेश पावसकर, साहिल सागर पावसकर, साक्षी संदीप पावसकर, ऋचा प्रमोद खेडेकर असे सहाजण जम्मू-काश्मीर येथे पर्यटनासाठी गेले होते. खरेतर ज्या दिवशी पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला, त्याच दिवशीही आम्ही सुद्धा पहलगामला जायचे निश्चित केले होते. मात्र, ऐन वेळी वातावरणातील बदलामुळे आम्ही पहलगाम भेटीची वेळ पुढे ढकलली. यामुळेे सुदैवाने आम्ही या हल्ल्यातून वाचलो.
मात्र, या दहशतवादी हल्ल्याची दाहकता आम्हाला संपूर्ण काश्मीर राज्यात जाणवत होती. विमानतळ आणि इतर सर्वच ठिकाणी याचे चित्र दिसत होते. सुदैवाने आम्हाला विमानाची तिकीटे वेळेत मिळाली आणि गुरुवारी सकाळी आम्ही सुखरूप तळेरे गावी पोहोचलो, अशी माहिती या पर्यटक पावसकर कुटुंबियांनी दिली.