Knife Attack on Driver | कारचालकावर प्रवाशांकडून चाकूने जीवघेणा हल्ला  pudhari photo
सिंधुदुर्ग

Knife Attack on Driver | कारचालकावर प्रवाशांकडून चाकूने जीवघेणा हल्ला

राजापूर ते गोवा प्रवासात महामार्गावर हुंबरट येथे प्रकार; हल्लेखोर पसार

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : राजापूर येथून स्विफ्ट कारने तीन प्रवाशांना घेऊन गोवा येथे निघाले असता त्या प्रवाशांनी चाकूने कार चालकावर जीवघेणा हल्ला केला. महामार्गावर हुंबरट येथे रविवारी रात्री १० वा. च्या सुमारास ही घटना घडली. कारचालकाने आरडाओरडा केल्यानंतर हल्लेखोर प्रवासी पसार झाले. जखमी कारचालक रेहान इकबाल सय्यद (३२, रा. वाघुवाड़ा-राजापूर) यांच्यावर सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

राजापूर बसस्टॅण्डवर गोवा येथे जाण्यासाठी तीन प्रवासी थांबले असल्याची माहिती रविवारी रात्री ८ वा. च्या सुमारास रेहान सय्यद यांना त्यांचा चुलत भाऊ वसीम मालिन याने दिली. त्यानंतर रेहान याने त्या प्रवाशांची भेट घेत राजापूर ते गोवा असे ४००० रु. भाडे ठरविले व त्या तीन प्रवाशांना घेऊन रेहान हे स्वीप्ट कारने गोवा येथे जाण्यासाठी निघाले.

रविवारी रात्री १० वा. च्या सुमारास कार हुंबरट येथे आली असता त्या प्रवाशांनी लघुशंकेसाठी कार थांबविण्यास सांगितली. कार थांबविल्या नंतर काही वेळात त्यातील एकाने गाडीच्या चावीची मागणी केली. त्याला रेहान याने नकार देताच गाडीत मागच्या सीटवर बसलेल्या दुसऱ्याने रेहान याचा गळा दाबून धरला तर तिसऱ्याने चाकू रेहान यांच्या छातीवर मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपण बाजूला सरकल्याने वार चुकला. त्यानंतर आपण कार मधून बाहेर पडलो. त्या प्रवाशांनी आपल्या दोन्ही पायांवर चाकूने वार करत जखमी केले. या हल्ल्यानंतर आपण आरडाओरडा केला असता हल्लेखोर पळून गेले.

रेहान विव्हळत असताना...

याच दरम्यान नांदगाव ते कणकवली मार्गावर पेट्रोलिंग करणाऱ्या आरटीओ अधिकाऱ्यांना रेहान हा रस्त्यावर विव्हळत पडलेला दिसला. त्यांनी लागलीच ही बाब कणकवली पोलिस ठाण्यात कळवली. घटनेचे गांभीर्य ओळखून कणकवली पोलिस निरीक्षक कमलेश बच्छाव, एपीआय गणेश पवार, पीएसआय प्रितेश पाटील, हवालदार शिवगण आदींनी घटनास्थळी भेट दिली. जखमी रेहान याला तत्काळ कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. गुन्ह्याच्या घटनेतील स्विफ्ट कार कणकवली पोलिस ठाण्यात आणण्यात आली असून कणकवली पोलिस हल्लेखोरांचा कसून तपास करत आहेत. जखमी रेहान याला अधिक उपचारासाठी सिंधुदुर्गनर्गरी येथे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. अधिक तपास सहा.पोलिस निरीक्षक गणेश पवार करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT