कणकवली : पालकमंत्री नितेश राणे यांच्या विविध घोषणा म्हणजे जनतेची फसवणूकच असून त्या केवळ ‘एप्रिल फूल’ ठरत आहेत. सिंधुदुर्गातील वाहनधारकांना टोल माफीची घोषणा पालकमंत्र्यांनी केली होती, त्याचे काय झाले? असा सवाल ठाकरे शिवसनेचे नेते, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला.
येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. परशुराम उपरकर म्हणाले, पालकमंत्र्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गवासीयांना म्हणजेच एमएच-०७ वाहनांना टोलमाफीची भेट दिल्याची घोषणा केली होती. मात्र टोलमाफीच्या जाहिरातीमध्ये एमएच-०७ वाहनांना कोणतीही स्पष्ट सूट नमूद नसल्याचा दावा उपरकर यांनी केला. टोलमाफीची घोषणा करून प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसेल तर ही जनतेची आणि जिल्ह्यातील व्यापारी संघटनांची दिशाभूल आहे, असे ते म्हणाले. टोलमाफीच्या मुद्द्यावरून जिल्ह्यातील जनता आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरल्यास आपण त्यांच्यासोबत राहू आणि आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही उपरकर यांनी दिला.
पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातच आरोग्य व्यवस्था ढासळलेली
जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवरही त्यांनी प्रश्न केले. पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातील तीनही तालुक्यांमध्ये आरोग्य यंत्रणेची स्थिती ढासळलेली असून, त्याचा आर्थिक फटका सर्वसामान्य जनतेला बसत असल्याचे ते म्हणाले. पालकमंत्र्यांनी यापूर्वी केलेल्या अनेक घोषणा हवेतच विरल्या आहेत. त्यामुळे आता नव्या घोषणांवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही, अशी टीकाही उपरकर यांनी केली.
पोकळ घोषणा काय कामाच्या?
विमानतळाच्या प्रश्नावरही उपरकर यांनी पालकमंत्र्यांच्या घोषणांवर टीका केली. १५ ऑगस्टला विमानतळावर विमान उतरविण्याची घोषणा करण्यात आली होती; मात्र त्याची पूर्तता झाली नाही, पालकमंत्र्यांकडून मोठमोठ्या घोषणा होतात मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसेल तर या घोषणा काय कामाच्या असा सवालही त्यांनी केला. मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरूनही त्यांनी सरकारला धारेवर धरले. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना यंदाही खराब रस्त्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. गणेशोत्सव काळात खासगी बस चालकांकडून मोठ्या प्रमाणावर भाडे आकारले जाते. या प्रश्नाकडे पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप उपरकर यांनी केला.