पडेल गावचे सुपुत्र संजय घाडी होणार मुंबईचे उपमहापौर! 
सिंधुदुर्ग

Mumbai Deputy Mayor : पडेल गावचे सुपुत्र संजय घाडी होणार मुंबईचे उपमहापौर!

11 फेब्रुवारी रोजी होणार अधिकृत घोषणा पडेल गावात चैतन्याचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

देवगड ः देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आणि आशियातील सर्वात मोठी महानगरपालिका असा लौकीक असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी शिंदे शिवसेनेच्या वतीने देवगड तालुक्यातील पडेल गावचे सुपुत्र संजय घाडी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. ही निवड 11 फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे. पडेल गावचे सुपुत्र उपमहापौरपदी विराजमान होणार असल्याने पडेल गावासह देवगड तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.

नुकत्याच झालेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये संजय घाडी हे दहिसर प्रभाग क्रमांक 5 मधून शिंदे शिवसेनेच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरूवात केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष असताना 1988-89 मध्ये संजय घाडी यांनी सिद्धार्थ कॉलेजमधून विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून भारतीय विद्यार्थी सेनेमधून निवडणूक लढविली व ते विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवडून आले. त्यानंतर विद्यापीठ प्रतिनिधी म्हणूनही ते निवडून आले. 1990-91 मध्ये मुंबई विद्यापीठ स्टुडंट कौन्सिल निवडणुकीमध्ये निवडून येवून त्यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली. 2017 ते 2022 पर्यंत ते दहिसर प्रभाग 5 मध्ये शिवसेनेचे नगरसेवक होते. नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत या प्रभागातून ते शिंदे शिवसेनेतर्फे ते नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.

त्यांचे बालपण व शिक्षण मुंबईत झाले. वडील मुंबई मध्ये नोकरीला होते. पडेल हे त्यांचे मुळ गाव असून पडेल-घाडीवाडी येथे त्यांचे घर आहे. सध्या त्या घरात त्यांचे चुलतभाऊ व त्यांचे कुटुंब राहते. संजय घाडी हे मुंबईत कायम वास्तव्यास असले तरीही पडेल येथे घरी ते गणेशोत्सव व नोव्हेंबर महिन्यात श्रीदेव रवळनाथ मंदिर उत्सवाला गावी येतात. तसेच मे महिन्यातही ते पत्नी व मुलगा यांच्यासमवेत येतात. जिल्ह्यात शिवसेना संघटना वाढीसाठीही त्यांच्याकडे त्यावेळी जबाबदारी देण्यात आली होती. येथील संघटना वाढीसाठीही त्यांनी त्यावेळी काम केले. मुंबई महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी त्यांचा नावाची घोषणा केल्यानंतर पडेल या त्यांचा मूळ गावी चैतन्याचे वातावरण असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT