रोहा तालुक्यात खरीप भातशेती क्षेत्र घटतेय pudhari photo
सिंधुदुर्ग

Paddy Cultivation Crisis | पाऊस गायब झाल्याने भातशेती धोक्यात

Paddy Cultivation Crisis | लावणी केलेली रोपे वाळू लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त

पुढारी वृत्तसेवा

नांदगाव : पुढारी वृत्तसेवा

गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस गायब झाल्याने लावणी केलेली भातरोपे वाळू लागली आहेत. येत्या दोन-चार दिवसांत पाऊस पडला नाही, तर भातरोपे वाळून जाण्याची व सुक्या दुष्काळाला सामोरे जावे लागण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. शेतकरी सध्या मोटर पंपाचा वापर करून भात लावणी उरकण्याच्या प्रयत्नात आहेत.

मात्र, पावसाअभावी लावणी केलेल्या खाचरात पाणीसाठा होत नसल्याने तसेच वरून कडक ऊन पडत असल्याने लावणी केलेल्या शेत जमिनीला भेगा पडण्याबरोबर भातरोपेही करपायला लागली आहेत. जिल्ह्यात यावर्षी मान्सून वेळेत दाखल झाला. मात्र, अल निनोच्या प्रभावामुळे पुढे १५ दिवस पाऊस पडलाच नाही.

जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने पेरणीही उशिराच झाली. त्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावून शेतकऱ्यांना दिलासा दिला. यामुळे भात पेरणी बरोबरच पहिल्या टप्प्यातील भात लावणी सुरू झाली.

शेतजवळ पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी मोटरपंपाचा वापर करून लावणी केली. मात्र, लावणीनंतर आवश्यक पाणी भात खाचरात न झाल्याने लावणी केलेली भातरोपे वाळू लागली आहेत. जिल्ह्याच्या काही भागांत गेल्या आठ दिवसांपासून पावसाचा एकही थेंब पडलेला नाही. परिणामी, लावणी केलेली भातरोपे पिवळी पडली असून पाऊस वेळेत न झाल्यास ही रोपे पुरती करपून जाण्याचा धोका आहे. ही भातरोपे रोगांनाही बळी पडण्याचा धोका आहे.

अन्य कामेही रखडली

भातशेती आटोपताच जिल्ह्यातील शेतकरी वरी, नाचणी, भुईमूग, कुळीथ, तीळ, उडीद अशी इतर पिकेही घेतात. मात्र, भात लावणीची कामे रखडल्याने वरील पिकांची पेरणी व अन्य कामे रखडल्याचे चित्र आहे. परिस्थिती अशीही राहिली, तर दुष्काळाला सामोरे जावे लागते की काय? अशीही भीती भेडसावू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT