Smart meter  file photo
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : ऐन गणेशोत्सवात महावितरणचा ‘स्मार्ट’ धक्का..!

४८ तासांची नोटीस देऊन मीटर बसवण्याचा सपाटा : मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाला हरताळ?

पुढारी वृत्तसेवा

​कुडाळ: राज्यभरात सध्या गणेशोत्सवाचा मोठा उत्साह असून नागरिक सण-उत्सवाच्या आणि व्यापाराच्या धामधुमीत व्यस्त आहेत. अशा ऐन सणाच्या काळात महावितरणने ग्राहकांना ४८ तासांची अल्टीमेटम नोटीस पाठवून 'स्मार्ट मीटर' बसवण्याची मोहीम सुरू केल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

कुडाळ उपविभागातून महावितरणने ग्राहकांना पाठवलेल्या नोटीसमध्ये पुढील ४८ तासांत जुने मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर बसवले जातील, असा इशारा दिला आहे. यावरून स्थानिक व्यापारी आणि नागरिकांमधून जोरदार विरोध सुरू झाला आहे.

लोकांच्या व्यस्ततेचा फायदा घेण्याचा प्रयत्न?

गणेशोत्सवाच्या काळात नागरिक पूजा-अर्चा, पाहुणचार आणि व्यापारात मग्न असतात. या काळात विरोध होणार नाही, असा हिशोब लावूनच महावितरणने हा 'स्मार्ट' डाव साधला आहे का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. "एकीकडे आनंदाने सण साजरा करायचा की दुसरीकडे महावितरणच्या या कारवाईला विरोध करून वातावरण तंग करायचे?" असा उद्विग्न सवाल नागरिक विचारत आहेत.

​मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाचे काय?

विधानसभेत खुद्द राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी "स्मार्ट मीटर सक्तीने बसवले जाणार नाहीत" असे स्पष्ट आश्वासन दिले होते. असे असतानाही महावितरणकडून ४८ तासांची मुदत देऊन अशा नोटिसा कशा काय बजावल्या जात आहेत? असा थेट प्रश्न आता विचारला जात आहे. प्रशासकीय आदेशांच्या नावाखाली मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनालाच हरताळ फासला जात असल्याचे या कारवाईवरून स्पष्ट दिसत आहे.​सणाच्या काळात अशी घाईघाईने व दडपशाहीने कारवाई न करता ही प्रक्रिया तात्काळ थांबवावी, अशी मागणी आता कुडाळसह संपूर्ण परिसरातून जोर धरू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT