Devgad Farmers Demand Insurance Compensation 
सिंधुदुर्ग

Devgad Farmers Demand Insurance Compensation | केवळ शिरगाव सर्कलमधील बागायतदारांना विम्याचा लाभ !

देवगड तालुक्यातील अन्य तीन मंडळातील आंबा उत्पादक लाभापासून वंचित

पुढारी वृत्तसेवा

देवगड : देवगड तालुक्यातील बागायतदारांना विम्याच्या माध्यमातून मिळणारी नुकसान भरपाई ही केवळ शिरगाव सर्कलला दिली जात असून देवगड, पडेल व बापर्डे या तीन सर्कलमधील बागायतदार या नुकसान भरपाईपासून वंचित आहेत. ही नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या हक्काची आहे. त्यामुळे तालुक्यातील उर्वरित तीनही सर्कलमधील शेतकऱ्यांना विम्याच्या माध्यमातून नुकसान भरपाई न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंबा-काजू बागायतदार व व्यापारी संघाचे अध्यक्ष काका ढोके व गणेश गावकर यांनी दिला.

काका ढोके म्हणाले, गेल्या दीड दोन महिन्यांपूर्वी येथील तहसील कार्यालयात तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींसमवेत झालेल्या बैठकीत बागायतदारांनी विमा कंपन्यांवर आरोप करताना ज्याठिकाणी आंबा बागायती जास्त आहे, त्याठिकाणचे ट्रिगर कमी दाखविले जात असल्याचे म्हटले होते. या बैठकीला तालुका कृषी अधिकारी, माजी आ. अॅड. अजित गोगटे उपस्थित होते. आता तो आरोप खरा ठरत आहे.

तालुक्यातील देवगड, पडेल व बापर्डे या तीन विभागातील बागायतदारांना विम्याच्या माध्यमातून मिळणाऱ्या नुकसान भरपाईपासून डावलले जात आहे. या सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणात आंबा बागायतदार आहेत. शेतकऱ्यांनी कष्टाचे पैसे विमा कंपन्यांना भरले आहेत. परंतु याच पैशांतून लाखो, करोडो रूपयांचा भ्रष्टाचार केला जात आहे. यावर्षी हंगामात बागायतदार नैसर्गिक संकटामुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडला होता.

केवळ शिरगाव सर्कलमधील बागायतदारांनाच विमा कंपन्याच्या माध्यमातून नुकसानभरपाई मिळणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी यांनी आपल्याला दिली आहे. मुळात देवगड, पडेल सर्कलमधून मोठ्या प्रमाणात विम्यासाठी पैसे भरले जातात. नुकसान झाल्यास विम्यातून भरपाई मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना असते. परंतु आज त्यांच्या सगळ्या अपेक्षेवर सरकारने पाणी ओतले आहे. विमा कंपनीने शेतकऱ्यांवर असाच अन्याय सुरू ठेवल्यास संबंधित कंपनी ब्लॅकलिस्टेड करण्यासाठी कंपनीच्याविरोधातही आम्ही रस्त्यावर उतरू.
- गणेश गावकर, आंबा-काजू बागायतार संघ, सदस्य

आंबा बागायतदारांना हेक्टरी ५ लाख रूपये तर काजू बागायतदारांना हेक्टरी ३ लाख रूपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली होती. परंतु शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, त्यामुळे विम्याच्या माध्यमातून मिळणाऱ्या नुकसानभरपाईत तालुक्यातील देवगड, पडेल, बापर्डे या सर्कलमधील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जात असेल तर त्यांच्या न्याय्य हक्कासाठी मोठे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT