सावंतवाडी : दाणोली विमला गार्डन येथे असलेल्या छोट्या पुलावर नदीचे पाणी बघायला गेलेल्या शिकाऊ फादर नोएल फेलिक्स तेकेकेकरा (२९. रा. नेरूळ, नवी मुंबई) याचा त्याचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला, पाण्याच्या जोरदार प्रवाहात ते वाहून गेले. त्यानंतर तातडीने बाबल आल्मेडा टीम आणि पोलिसांनी शोध मोहीम राबवली. नोएल तेकेकेकरा त्यामुळे दोनशे फुटांवर त्याचा मृतदेह मोठ्या पुलाच्या खाली आढळून आला. ही घटना सोमवारी दुपारी १.३० वा. च्या सुमारास घडली.
दाणोली येथे ख्रिश्चन मिशनरी यांची संस्था असून या ठिकाणी फादर ख्रिश्चन धर्मगुरूचे शिक्षण घेण्यासाठी नोएल तेकेकेकरा आले होते. गेली पाच महिने ते या ठिकाणी राहून शिक्षण घेत होते. पुढील शिक्षणासाठी ते मुंबईला जाणार होते. तत्पूर्वी मंगळवारी त्यांना पुणे येथे घरी जायचे होते. सोमवारी दु. १ वा. च्या सुमारास सलग दीड तास न थांबता मोठा पाऊस पडला. त्यामुळे दाणोली नदी तसेच छोट्या पुलावर पाण्याचा अचानक झोत वाढला होता.
जेवण आटोपून संस्थेच्या आवारात फिरत असताना दाणोली येथील छोट्या पुलावर पाणी बघण्यासाठी ते गेले होते. त्यांच्यासोबत एक लहान मुलगा देखील होता. पुलावर थांबून पाणी बघत असताना अचानक पाय घसरून तोल जाऊन ते नदीच्या पाण्यात पडले. पावसामुळे नदीच्या पाण्याचा प्रवाह आणखीनच वाढला. त्यामुळे ते पाण्याच्या प्रवाहबरोबर वाहून गेले. त्यांनी झाडाना पकडून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु, नदीच्या पाण्याचा जोर वाढतच गेल्यामुळे त्याचा निभाव लागला नाही.
झालेल्या घटनेबाबत लहान मुलाने तातडीने जाऊन संस्थेच्या फादर व इतर मंडळीना कल्पना दिली. सर्वांनी तातडीने नदीच्या ठिकाणी धाव घेतली. मात्र, नोएल कुठेच आढळून आले नाहीत. तत्काळ पोलिस व बाबल आल्मेडा रेसक्यू टीमला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. आंबोली पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस हवालदार दत्ता देसाई यांनी घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम सुरू करण्यात आली. आल्मेडा टीमने पाण्यात उतरून शोध घेतला. दोन तासानंतर त्याचा मृतदेह २०० फुटावर दाणोली येथील मोठ्या पुलाच्या खाली आढळून आला.