बांदा : दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून संचार करणाऱ्या ओंकार हत्तीने मंगळवारी रात्री कृषिप्रधान विलवडे गावात प्रवेश केला. बांदा, कास, मडुरे, इन्सुली, पाडलोस आणि सोनुर्ली परिसरातून मार्गक्रमण करत रात्री ९.३० वा.च्या सुमारास त्याने विलवड-े टेंबवाडी गाठली. गावात दाखल होताच त्याने एका चारचाकीचे नुकसान केले, तर घराशेजारील पाण्याची टाकी फोडली. शेतातील पिकांचेही नुकसान केल्याने विलवडे, मळावाडी आणि टेंबवाडी ग्रामस्थांनी भीतीच्या सावटाखाली रात्र जागून काढली.
मंगळवारी रात्री ‘ओंकार’ टेंबवाडी परिसरात दाखल झाल्याची माहिती मिळताच वन कर्मचारी सतर्क झाले. त्यांनी ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. रात्री १२.४७ वा. ओंकार विलास मुकुंद सावंत यांच्या घर परिसरात पोहोचला. व त्याने घराशेजारी उभ्या कारला धडक देत कारच्या काचा फोडल्या. तर बोनेटही चेपले गेले. यानंतर ‘ओंकार’ने बांदेकर यांच्या शेतात घुसत कांचे नुकसान केले. पुढे तेथीलच क्रस्तु पावलू यांच्या घराशेजारील ५०० लिटरची पाण्याची टाकी फोडून टाकली.
रात्री १.२३ वा.खामदेव मंदिरामागील परिसरात ओंकार ड्रोन कॅमेऱ्यात दिसून आला. त्यानंतर त्याने महार काटे परिसराकडे मार्गक्रमण केले. बुधवारी सकाळी नदी परिसरात त्याचा वावर सुरू असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली.
शेती नुकसानीने शेतकरी हतबल
विलवडे हे प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असलेले गाव आहे. भात, नाचणी, काजू, वाल तसेच विविध प्रकारचा भाजीपाला ही येथील प्रमुख पिके आहेत. गेल्या काही वर्षांपासून परिसरात हत्तींचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आधीच विविध नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता हत्तींच्या उपद्रवाचे नवे संकट उभे राहिले आहे. रात्रीच्या वेळी शेतात राखण करावी लागत असल्याने महिला, लहान मुले आणि वृद्धांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.