बांदा : गोवा हद्दीतून परत आल्यावर ‘ओंकार’ हत्ती शनिवारी दुपारी सिंधुदुर्गातील सातोसे-मडूरा परिसरात दाखल झाला तर सांयकाळी त्याने कास गावात प्रवेश केला होता. हत्ती गावात आल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. अनेकांनी मोबाईलवर फोटो व व्हिडिओ टिपून ते समाजमाध्यमांवर शेअर केले.
गेल्या काही महिन्यांपासून ‘ओंकार’ हत्ती सातत्याने दोडामार्ग, बांदा, तिलारी, मोपा, तोरसे या भागात फिरत आहे. त्याच्या वावरामुळे शेतकरी आणि ग्रामस्थ हैराण झाले आहेत. शेती, बागायती व भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या तक्रारी वारंवार मिळत आहेत. स्थानिकांना माहिती आहे की, हत्तीला ‘ओंकार’ असे हाक मारल्यावर तो त्या व्यक्तीकडे येतो. याचे काही व्हिडिओ आधीपासून सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये हत्तीबद्दल उत्सुकता आणि आपुलकी निर्माण झाली आहे. अनेक जण त्याला पाहण्यासाठी तसेच फोटो-व्हिडिओ टिपण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
सध्या हा हत्ती सातोसे-मडूरा परिसरात शेतकरी व बागायत क्षेत्रात फिरत आहे. गावाच्या अंगणाजवळ आणि पाणवठ्याजवळही त्याची हालचाल दिसून येते. दिवसाढवळ्या तो शेतात शिरून भातशेती, भाजीपाला आणि फळबागांचे नुकसान करत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. वन विभागाने या हत्तीला सुरक्षित पकडून त्याच्या मूळ अधिवासात पाठवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, मात्र ते प्रयत्न यशस्वी होत नाहीत. हत्तीला जेरबंद करणे किंवा हुसकावून लावणे कठीण ठरत आहे.
‘ओंकार’ हत्तीला सुरक्षित पकडून दूरच्या जंगलात सोडावे. यामुळे मानवी जीवितहानी टळेल आणि शेतीचे नुकसानही थांबेल, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. दरम्यान हत्तीचे फोटो-व्हिडिओ काढताना त्याला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच लांब अंतर ठेवावे, अशी सूचना बांदा पोलिस व वन अधिकार्यांनी केली आहे.
शनिवारी संध्याकाळपर्यंत ‘ओंकार’ हत्ती कास गावाच्या परिसरात दाखल झाला होता, तेथून तो पुन्हा सातोसे येथे मार्गस्थ झाला. हत्ती दाखल झाल्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. सध्या सिंधुदुर्गात भातकापणी जवळ आली आहे. हत्तीच्या उपस्थितीमुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे.