मडुरा : चार दिवसापूर्वी गोवा राज्यातील तांबोसे परिसरातून तेरेखोल नदी पार करून ‘ओंकार’ या टस्कर हत्तीने कास गावात प्रवेश केला. तेव्हापासून त्याने कास गावात ठाण मांडला असून त्याने गावातील शेती, बागयती उद्ध्वस्त करण्यास सुरूवात केली आहे, यामुळे शेतकर्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
बुधवारी सकाळी तो गावात भातशेतीत फिरताना दिसून आला. तो एवढ्या वेगाने शेतात फेर धरत होता की पाहणार्यांना तो जणू काही गरबा घालत आहे, असे दृश्य अनुभवायला मिळाले. मात्र या विनोदी वाटणार्या प्रसंगामागे शेतकर्यांचे मोठे नुकसान दडले आहे. ‘ओंकार’च्या या मुक्त वावराने गावातील भात शेती तुडवली जात असून शेतकर्यांचे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर कास सरपंच प्रवीण पंडित यांनी सावंतवाडी येथे जिल्हा उपवनसंरक्षकांची भेट घेऊन ‘ओंकार’चा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली. केवळ फटाके लावून हत्तीला पळवण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. ठोस कार्यवाही आवश्यक आहे. तसेच नुकसानीची भरपाई देताना कोणत्याही अटी-शर्ती न ठेवता सर्व नुकसानग्रस्त शेतकर्यांना तातडीने मदत देण्याची मागणी त्यांनी केली.