बांदा : दोडामार्ग भागात काही दिवस धुडगूस घालणारा ‘ओंकार’ हा हत्ती शनिवारी रात्री महाराष्ट्र-गोवा सीमेत गेला. कडशी नदी पार करून त्याने गोव्याच्या मोपा गावात प्रवेश केला. रात्री उशिरा तो थेट मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील जंगलात गेला.ओंकार हा तरुण आणि आक्रमक असल्याने गावकर्यांनी सावध राहावे, रात्री विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे. गावकरी म्हणतात, हा हत्ती महाराष्ट्र-गोवा सीमेवरच फिरत असून कधीही परत महाराष्ट्रात येऊ शकतो.
शनिवारी सकाळपासून तो नेतर्डे गावाजवळील धनगरवाडी आणि खोलबागवाडीत होता. दुपारी पाणवठ्याजवळ थांबून तो पुन्हा पुढे सरकला. रात्री उशिरा गावकर्यांना आणि वनविभागाला तो दिसला. त्यानंतर नदी पार करून तो गोव्यात गेला.विमानतळाजवळील दिवे आणि गर्दी पाहून तो परत मोपा गावाकडे गेला. दिवसभर मोपा, कडशी आणि चांदेल या भागात तो थांबला.
काही शेतकर्यांच्या काजूबागेत त्याने आसरा घेतला. गोवा वनविभागाचे पथक त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. या परिस्थितीत सिंधुदुर्ग वनविभागही सावध झाला आहे. जलद कृती दल आणि अधिकारी सीमेवर गस्त घालत आहेत. मिनिष शर्मा, सुहास पाटील, प्रमोद राणे आणि बबन रेडकर यांच्या पथकाने दिवसभर हालचाल पाहिली.