बांदा : मुख्य कळपापासून दुरावलेला तरुण ‘ओंकार’ हत्ती गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग-गोवा सीमेवर मुक्त संचार करत असून, गावोगावी थराराचे वातावरण निर्माण झाले आहे. कधी महाराष्ट्राच्या तर कधी गोव्याच्या जंगलात असा त्याचा दौरा सुरू आहे. वनविभागाची पथके सतत सज्ज असली तरी ओंकारच्या चपळ हालचालींनी त्यांना अक्षरशः गुंगारा दिला आहे.
सावंतवाडी तालुक्यातील गाळेल, डोंगरपाल, नेतर्डे, खोलबाग, डिंगणे या गावात गेल्या काही दिवसांत ओंकारने फेरफटका मारला. तर गोवा राज्यातील मोपा, खडशी, दुजगी, फकीरपाटा, तोरसे या भागांतही तो मुक्तपणे फिरला. सतत फिरत असल्याने त्याने वनविभागाची दमछाक केली. गेल्या रात्री सिंधुदुर्गात दाखल झाल्यावर ओंकारने लोकवस्ती जवळील केळीची रोपे फस्त केली.
सध्या ओंकारच्या अनिश्चित हालचालींमुळे सिंधुदुर्ग व गोवा वनविभागांच्या पथकांवर मोठा ताण आहे. मुख्य कळपात तो परतला नाही, तर पुढील दिवसांत ही डोकेदुखी वाढणार, अशी भीती व्यक्त केली जात आहे. सीमेवरील गावे भीती, थरार आणि दयाळूपणाच्या भावनांनी व्यापली असून, ‘ओंकार’चा हा सतत बदलणारा प्रवास नागरिकांसाठी कौतुकाचा, तर वनविभागासाठी मोठ्या परीक्षेचा विषय ठरत आहे.
21 दिवसांनी जसा तू बाप्पा आज तुझ्या घरी सुखरूप जातो आहेस, तसाच ओंकारही आपल्या कळपात, आपल्या घरात परत जावो. कोणत्याही अडचणीशिवाय त्याचा प्रवास होवो, आणि आमच्यावरची भीती तुझ्या कृपेने दूर होवो.