कुडाळ : ओबीसी समाज आंदोलनात सहभागी माजी आ. परशुराम उपरकर व ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर. सोबत नितीन वाळके, काका कुडाळकर, सुनील भोगटे, राजन नाईक, श्रीराम शिरसाट, रूपेश पावसकर व अन्य. (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Kudal OBC Agitation | ओबीसींच्या प्रश्नांबाबत प्रसंगी प्रखर आंदोलन!

समाज बांधवांचा निर्धार : उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या कुडाळ येथील इशारा आंदोलनाची सांगता

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ : नागपूर येथे 28 सप्टेंबर रोजी होणार्‍या ओबीसी समाजाचा महामोर्चाला पाठिंबा देण्यासह, हैद्राबाद गॅझेट रद्द करावे, तसेच ओबीसी समाजाची जनगणना करावी आदी विविध मागण्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघाने मंगळवारपासून सुरू केलेल्या इशारा आंदोलनाची समाप्ती बुधवारी सायंकाळी झाली. या आंदोलनाला जिल्हाभरातीलओबीसी व आरक्षित समाज बांधवांचा प्रतिसाद मिळाला. यापुढेही समाजाची एकजूट कायम ठेवून, समाजाच्या प्रश्नांसाठी प्रसंगी प्रखर आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आल्याची माहिती ओबीसी व आरक्षित समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन वाळके व सरचिटणीस सुनील भोगटे यांनी दिली.

ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांबाबत सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघाच्या नेतृत्वाखाली कुडाळ जिजामाता चौक येथे मंगळवार व बुधवार असे दोन दिवस लाक्षणिक उपोषण आणि धरणे आंदोलन छेडत शासनाचे लक्ष वेधण्यात आले. बुधवारी दुसर्‍या दिवशीही या आंदोलनाला जिल्हाभरातील ओबीसी व आरक्षित समाज बाधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हैद्राबाद गॅझेट रद्द करावे, ओबीसी समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात, ओबीसी समाजाची जनगणना करण्यात यावी अशी आग्रही मागणी या इशारा आंदोलनात लावून धरत, सरकारला इशारा दिला. ‘ओबीसी समाज एकजुटीचा विजय असो’, ‘उठ ओबीसी जागा हो, संघर्षाचा धागा हो’, ‘हैद्राबाद गॅझेट रद्द करा’ अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बुधवारी ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार परशुराम उपरकर व जिल्हाप्रमुख संदेश पारकर, काँग्रेस महिला आघाडी जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, समीर वंजारी यांच्यासह जिल्हाभरातील ओबीसी व आरक्षित समाज संघटनांचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकार्‍यांनी या आंदोलनाला उपस्थित राहून पाठिंबा दिला.

यावेळी जिल्हा ओबीसी व आरक्षित समाज महासंघ जिल्हाध्यक्ष नितीन वाळके, समता परिषदेचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक काका कुडाळकर, महासंघ जिल्हा कार्याध्यक्ष चंदशेखर उपरकर, सरचिटणीस नंदन वेंगुर्लेकर, सुनील भोगटे, भंडारी समाज कुडाळ तालुकाध्यक्ष अतुल बंगे, देवळी समाज जिल्हाध्यक्ष राजन नाईक, आनंद मेस्त्री, महेश परूळेकर, रूपेश पावसकर, राजू गवंडे, समील जळवी, संदीप म्हाडेश्वर आदींसह जिल्हाभरातील ओबीसी समाज संघटनांचे नेते, पदाधिकारी, प्रतिनिधी व बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते.

प्रमुख पदाधिकार्‍यांनी मनोगते व्यक्त केली. नंदन वेंगुर्लेकर म्हणाले, या आंदोलनात ओबीसी व आरक्षित समाजाची एकजूट दिसून आली. लवकरच ओबीसी समाजाच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात पातळीवर बैठक होणार असून, भविष्यात समाजाचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी इथून पुढे अशीच एकजूट कायम ठेवूया.

अतुल बंगे म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात ज्या प्रमाणे समाजाच्या मागण्यांबाबत ओबीसी समाजाचे आंदोलने होत आहेत, तशाच प्रकारे हे सिंधुदुर्गात मोठ्या स्वरूपात आंदोलन झाले आहे. सुनील भोगटे म्हणाले, या आंदोलनाला दोन्ही दिवस जिल्हाभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. नागपूर येथे होणार्‍या ओबीसी समाजाच्या महामोर्चाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओबीसी व आरक्षित समाज बांधवांचा पाठिंबा असून मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT