सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाच्या पटलावर महायुती सरकारची स्पष्ट भूमिका मांडली आहे. वाळू चोरी, वाळूमाफिया, अनधिकृत वाळू उत्खनन करणार्यांची आमचे सरकार अजिबात गय करणार नाही. भ्रष्टाचारमुक्त प्रशासन कसे असते हे कृतीतून दाखविण्याचे काम आणि शब्द महाराष्ट्राच्या जनतेला मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. वाळू चोर, वाळूमाफियांविरोधात कडक सेक्शन लावून कारवाई केली जाईल, त्यांचे हात कापले पाहिजेत. तशा पद्धतीची कारवाई येत्या काळात आमचे प्रशासन करताना तुम्हाला दिसेल. वाळू चोरी करताना या माफियांना दहा वेळा आपल्या कुटुंबीयांची आठवण येईल, असा इशारा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला.
स्वातंत्र्यदिन कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद करताना ते बोलत होते. मंत्री राणे म्हणाले, सिंधुदुर्गच्या भविष्याबरोबर कुणी खेळता कामा नये. ज्या गोष्टी माझ्या वडिलांनी त्यांच्या कारकिर्दीत कधी होऊ दिल्या नाहीत त्या माझ्या कारकिर्दीत होऊ देणार नाही, असा इशारा ना. राणे यांनी दिला.
सध्या सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणावर वाळू चोरी आणि वाळू माफियांनी उच्छाद मांडला आहे. अलिकडेच सिंधुदुर्ग जिल्हा दौर्यावर आलेले महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही वाळू माफियांवर कडक कारवाई करताना एमपीडीए कायदा लागू करण्याचा इशारा दिला होता. त्याचप्रमाणे ना. नितेश राणे यांनीही या वाळू माफियांविरोधात कडक भुमिका घेतली आहे. वाळू माफियांना कोणाचा कितीही पाठींबा असला तरीही त्यांना सोडले जाणार नाही. वाळूच्या चोरी मागून अमली पदार्थांचा व्यवसाय करून पिढी बरबाद करण्याचा जो प्रयत्न सूरू आहे तो कदापी खपवून घेणार नाही असा सज्जड इशाराही पालकमंत्र्यांनी दिला.