सावंतवाडी ः माझ्या आणि आ. केसरकर यांच्या कामाची पद्धत थोडी वेगळी आहे, ते प्रेमाने घेतात, आम्ही दुसऱ्या बाजूंचे आहोत. मात्र काम करून घेण्याची पद्धत व हेतू दोघांचाही एकच आहे. शेवटी लोकांचं काम झालं पाहिजे. लोकांची कामं व्हायला पाहिजेत तर दोन्ही पद्धत अवलंबली गेली पाहिजे. आमची पद्धत कमी बॉलमध्ये जास्त रन अशी असून आम्ही 20-20 चे खेळाडू आहोत. तर केसरकर टेस्ट मॅचवाले आहेत. पद्धत जरी वेगळी असली तरी शेवटी मॅच जिंकणं महत्त्वाचं आहे. मॅच जिंकणं हा आमचा सर्वांचा दृष्टिकोन आहे, अशी फटकेबाजी करतानाच शासकीय अधिकाऱ्यांबद्दल कोणाच्या तक्रारी येता कामा नयेत.अशा तक्रारी आल्या तर कार्यालयात अचानक भेट देऊन कारवाई केली जाईल, असा इशारा पालकमंत्री नीतेश राणे यांनी दिला.
सावंतवाडी येथे प्रांताधिकारी कार्यालय इमारत भूमिपूजन कार्यक्रमात ना. राणे बोलत होते. या कार्यालयीन इमारतीतून जनतेला अपेक्षित असा पारदर्शक व गतिमान कारभार केला जावा. येत्या वर्षभरात ही इमारत बांधून पूर्ण झाली पाहिजे या गतीने काम करावे. ग्रामीण भागातून येणाऱ्या जनतेची कामे झाली पाहिजेत. प्रशासन गतिमान झाले पाहिजे,म्हणूनच ही कार्यालये सुसज्ज व नवीन उभारली जात आहेत. अधिकाऱ्यांनी आपल्या पारदर्शक व गतिमान कारभाराने जनतेचा विश्वास संपादन करावा, असे आवाहन त्यांनी केले.
इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री नीतेश राणे यांच्याहस्ते तर आ. दीपक केसरकर व नगराध्यक्षा श्रध्दाराजे भोंसले यांच्या प्रमुख उपस्थित झाले. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनिष दळवी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, प्रांताधिकारी समीर घारे , युवराज लखमराजे भोंसले, पुणे उपसंचालक हेमंत निकम, तहसीलदार श्रीधर पाटील, संचालक विद्याधर परब, सार्व. बांधकामचे अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी, सहा.अभियंता अजित पाटील, उपअभियंता सीमा गोवेकर, शाखा अभियंता विजय चव्हाण, अशोक दळवी, ॲड.निता सावंत-कविटकर, नगरसेवक बाबू कुडतरकर, देव्या सूर्याजी, ॲड.सायली दुभाषी, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, प्रतीक बांदेकर, दिपाली भालेकर, मोहिनी मडगावकर आदी उपस्थित होते.
मंत्री राणे म्हणाले, या प्रशासकीय इमारतीसाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 4 कोटी 33 लाख रुपयांचा निधी दिला आहे. येत्या वर्षभरात ही इमारत पूर्ण होऊन जनतेची कामे सुरु झाली पाहिजेत या दृष्टिने ठेकेदार,जिल्हा प्रशासन व बांधकाम विभागाने प्रयत्न करावा, तसे झाले तर आम्ही त्यांचे कौतुक करु. तीन तालुक्यांचे मिळून एक उपविभाग आहे. त्यामुळे हे उपविभागीय महसूल कार्यालय म्हणजे मिनी विधानसभा असून या नवीन प्रशासकीय कार्यालयात लोकाभिमुख व पारदर्शक कारभार अपेक्षित असल्याचेही त्यांनी म्हटले. आ. केसरकर यांनी दोनवेळा मंत्रीपदावर काम केले आहे. प्रशासनाचा त्यांना चांगला अनुभव आहे . त्यामुळे त्यांचे येथील प्रशासनावर लक्ष असणारच आहे. तरीही मी देखील वारंवार येथील कारभारावर लक्ष देणार असल्याचे ना. राणे म्हणाले. या उपविभागात येणारे तीन तालुके विकास व गुंतवणुकीच्या दृष्टिने महत्त्वाचे आहेत. यात सावंतवाडी उपविभागाने गतिमान निर्णय घेऊन विकासात योगदान द्यावे असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
आ. दीपक केसरकर म्हणाले, या नूतन व सुसज्ज प्रशासकीय इमारत उभारणीमुळे नागरिकांच्या सेवा सुविधेत भर पडणार आहे. प्रांताधिकारी समीर घारे व त्यांची टीम यांनी जनतेला न्याय द्यावा. पालकमंत्री नीतेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयाचा लोकाभिमुख व पारदर्शक कारभार सुरु आहे, त्याला गती देण्याचे काम अधिकाऱ्यांकडून व्हावे असे आवाहन केले.जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी प्रशासनाच्या नूतन इमारतीतून वेगवान व गतीमान कारभार व्हावा हा हेतू आहे.जनता प्रथम ही भूमिका ठेवून प्रशासन काम करेल अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रांताधिकारी समीर घारे यांनी आभार मानताना या प्रशासकीय इमारतीतून चांगले व आदर्शवत असे जनतेला अपेक्षित काम केले जाईल, कुठलीही तक्रार व सर्वसामान्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊ असे आश्वासन दिले.