ओरोस : जिल्ह्यात उपलब्ध आणि सध्या वापरात न येता जाळून टाकल्या जाणाऱ्या गवताचे शास्त्रीय पद्धतीने संकलन करून त्यावर प्रक्रिया करावी. त्याची पौष्टिकता वाढवून जनावरांसाठी उपयुक्त चारा तयार करावा आणि हा अतिरिक्त चारा गरज असलेल्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये पाठविण्याचे नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिरिक्त गवताचा योग्य वापर करून राज्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी चारा व्यवस्थापन साखळी विकसित करण्याचे आवाहन त्यांनी केले.
जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चारा व्यवस्थापन कृती दलाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात चितळे ग्रुपच्या प्रतिनिधींसमवेत आयोजित बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी चारा नियोजन माहिती दिली. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध सुका चारा अनेकदा जाळून टाकला जातो. या गवताचा शास्त्रीय पद्धतीने उपयोग करून जनावरांसाठी पोषक आहार तयार करता येऊ शकतो. यासाठी चितळे दुग्ध विकास व विस्तार विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील गवताचे नमुने घेण्यात आले असून, त्यांचे परीक्षण करून चारा निर्मितीच्या दृष्टीने पुढील कार्यवाही करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.
मंत्री राणे म्हणाले, जिल्ह्यातील सर्वच वापरात न येणारा आणि जाळून टाकला जाणारा चारा योग्य पद्धतीने कापून त्याचे संकलन व जतन करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे तयार केलेला चारा इतर दुष्काळी जिल्ह्यातील जनावरांसाठी उपयुक्त ठरेल. जिल्ह्यातील जनावरांसाठी आवश्यक चारा राखून ठेवून उर्वरित चारा टंचाई असलेल्या जिल्ह्यांना पाठविण्याची व्यवस्था करावी. कोकणातून उर्वरित महाराष्ट्राला चारा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने पुढाकार घ्यावा. ही प्रक्रिया केवळ यंदापुरती मर्यादित न ठेवता दरवर्षी राबविता येईल, असे नियोजन करावे. त्यासाठी चारा संकलन, प्रक्रिया, साठवणूक आणि वाहतूक यांची सुसूत्र व्यवस्था निर्माण करावी. एकदा विकसित झालेली ही चारा साखळी दरवर्षी उपयोगात आणता येईल. त्यामुळे उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचा अपव्यय टाळण्यासोबतच दुष्काळी भागातील पशुधनासाठी मोठी मदत होऊ शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
चितळे ग्रुपचे गिरीश चितळे यांनी जिल्ह्यातील गवताच्या नमुन्यांच्या आधारे दोन दिवसांत अहवाल सादर करून उपलब्ध गवताचा चारा म्हणून कितपत उपयोग करता येईल, त्यावर कोणत्या प्रकारची प्रक्रिया आवश्यक आहे आणि त्यापासून किती पोषक आहार तयार करता येईल, याबाबत माहिती देण्यात येईल, असे सांगितले.