सर्व्हिस रोडवरील बेशिस्त पार्किंग, अतिक्रमणे तत्काळ हटवा 
सिंधुदुर्ग

Sindhudurg : सर्व्हिस रोडवरील बेशिस्त पार्किंग, अतिक्रमणे तत्काळ हटवा

कणकवली शहर आढावा बैठकीत पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

कणकवली ः कणकवली शहरातील विविध प्रश्नांबाबत नगरपंचायत, पोलिस प्रशासन, महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून हे प्रश्न सोडवण्याची आवश्यकता आहे. उड्डाणपुलाखाली अनधिकृतपणे कायमस्वरुपी केले जाणारे पार्किंग, सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणे आणि बेशिस्त पार्किंग तत्काळ हटवण्यात यावे. रेलिंग तोडून करण्यात आलेले मिडलकट बंद करण्यात यावेत. यासाठी नगरपंचायत प्रशासनाने ठोस भुमिका घेऊन ही कार्यवाही करावी. बाजारपेठेतील व्यापार्‍यांचे प्रश्नही तातडीने सोडवावेत. शहरात विद्रुपीकरण होता नये, याची काळजी घ्यावी अशा सुचना पालकमंत्री नितेश राणे यांनी अधिकार्‍यांना केल्या.

कणकवली शहरातील विविध समस्यांबाबत व्यापारी संघाच्यावतीने पालकमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राणे यांच्या उपस्थित शुक्रवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृहावर आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, न.पं. मुख्याधिकारी गौरी पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे, पोलिस निरीक्षक मारुती जगताप, महामार्ग प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंता अनामिका जाधव यांच्यासह अन्य खात्यांचे अधिकारी तसेच ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, कणकवली तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, उपाध्यक्ष राजन पारकर, विलास कोरगावकर, मंदार आळवे, राजेश राजाध्यक्ष, दयानंद उबाळे आदी उपस्थित होते.

या बैठकीत उड्डाणपुलाखालील कायमस्वरुपी पार्किंग केलेली वाहने तत्काळ हटविण्याची मागणी व्यापार्‍यांनी केली. ही वाहने तत्काळ हटवा, आवश्यकता वाटल्यास दंडात्मक कारवाई करा, अशा सुचना पालकमंत्र्यांनी आरटीओ श्री. काळे यांना केल्या. महामार्ग सर्व्हिस रोड तसेच फुटपाथवर दुकाने, स्टॉल लावून अतिक्रमण करण्यात आले आहे. उड्डाणपुलाखालीही अनधिकृत स्टॉल उभारण्यात आले आहेत. या बेशिस्त पार्किंग, फेरीवाल्यांमुळे वाहतुकीला वारंवार अडथळा होतो याकडे लक्ष वेधण्यात आले. त्यावर पालकमंत्र्यांनी मुख्याधिकारी गौरी पाटील यांना याबाबत कारवाई करण्याचे सांगत संबंधितांना स्टॉल लावण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.

उड्डाणपुलाखालील गाळ्यांचे होणार सुशोभीकरण

कणकवलीत उड्डाणपुलाखाली सध्या भाजीवाले तसेच अन्य दुकाने थाटण्यात आली आहेत. भाजीवाल्यांना लवकरच कायमस्वरुपी मार्केट उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच त्याठिकाणी पार्किंग व्यवस्थाही केली जाणार आहे. मात्र तोपर्यंत टप्प्याटप्प्याने उड्डाणपुलाखालील गाळ्यांचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. सुशोभिकरणासाठी उड्डाणपुलाखालील जागा नगरपंचायतीकडे वर्ग करण्यात आली आहे. त्याला मंजुरी मिळून प्रत्यक्ष कार्यवाही होईपर्यंत वेळ जाणार आहे. तोपर्यंत ते गाळे ज्यांना शक्य आहे त्या सामाजिक संस्था, व्यापारी संघ, प्रशासन यांच्याकडून टप्प्याटप्प्याने विकसित करता येतील असे प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी सुचविले. त्याला पालकमंत्र्यांनी संमती दर्शवत त्याची सुरुवात येत्या 23 जून रोजी करावी, अशा सूचना व्यापारी संघाला केल्या. त्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने अन्य गाळेही सुशोभिकरण केले जाणार आहेत.

सर्व्हिस रोडवर ठिकठिकाणी दोन्ही बाजूंनी पार्किंग केले जाते. त्यामुळे एसटी बस थांब्यावर गैरसोय होते. त्या ठिकाणी नो पार्किंग बोर्ड लावण्यात यावेत. सर्व्हिस रोडवर खड्डे पडले आहेत ते तात्काळ बुजवावेत. सर्व्हिस रोडवरील स्ट्रिट लाईट अनेक ठिकाणी बंद असून त्या तात्काळ सुरू कराव्यात अशा सुचना पालकमंत्र्यांनी कार्यकारी अभियंता अनामिका जाधव यांना केल्या. कणकवली बाजारपेठेत बाहेरील विक्रेते, फेरीवाल्यांमुळे वाहतुकीला अडथळा येतो, काही दुकाने रस्त्यापर्यंत लागलेली असतात, त्यामुळेही वाहतूक कोंडी होते याकडेही व्यापार्‍यांनी लक्ष वेधल्यानंतर त्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सुचना ना. राणे यांनी मुख्याधिकार्‍यांना केल्या. कणकवलीत महाराष्ट्राबाहेरील काही फळ विक्रेते व्यवसाय करतात, त्यांचीही शहानिशा करण्यात यावी. आरटीओ, पोलिस, नगरपंचायत आणि हायवे प्राधिकरण यांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे अशा सुचना पालकमंत्र्यांनी केल्या.

आठवडा बाजारावेळी काही बाहेरील विक्रेते स्वस्त दराच्या नावाखाली वजनमापात फसवणूक करतात, अशा तक्रारी असल्याचे अशोक करंबेळकर यांनी सांगितले. याबाबत वजनमाप नियंत्रक अधिकार्‍यांनी तातडीने लक्ष घालावे अशा सुचना पालकमंत्र्यांनी केल्या. फुड सेफ्टिबाबतही लक्ष वेधण्यात आले. त्यावर संबंधित अधिकार्‍यांना सुचना देण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT