ओरोस : जनतेच्या अडचणी दूर करणे हे पालकमंत्री म्हणून माझे कर्तव्य आहे. त्यामुळे लोकांशी सातत्याने संवाद साधणे, त्यांच्या गाठीभेटी घेणे आणि त्यांच्या समस्या तात्काळ सोडवणे यावर आमचा भर आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री नीतेश राणे यांनी केले.
जनतेच्या प्रश्नांना त्वरित न्याय मिळावा आणि प्रशासन अधिक लोकाभिमुख व्हावे, या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या पालकमंत्री कक्षात शनिवारी मंत्री नीतेश राणे यांनी जनतेशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जिल्ह्यातील विविध भागांतून मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून आपली निवेदने सादर केली.
पालकमंत्री म्हणाले, जनतेला वारंवार शासकीय कार्यालयांचे फेरे मारावे लागू नयेत, यासाठीच पालकमंत्री कक्षाची सुरुवात करण्यात आली आहे. जनतेला थांबवून ठेवण्यापेक्षा त्यांच्या प्रश्नांचे जलद निवारण करणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. त्यामुळे आम्ही जनतेच्या अधिकाधिक जवळ जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या संवादावेळी अनेक नागरिकांच्या निवेदनांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले. जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष तुकाराम उर्फ दादा साईल, सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी तसेच अन्य लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात आयोजित जनता दरबारामध्ये विविध नागरिकांनी समस्या मांडत निवेदने सादर केली. यामध्ये शेत जमिनीवरील वाट अडविण्यात आल्यामुळे ती मोकळी करून देण्याची मागणी करण्यात आली. तसेच वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत मिळावी यासाठीही नागरिकांनी निवेदन दिले. अणाव नदीतील गाळ काढण्याची मागणी करण्यात आली. दिव्यांग कल्याण योजनेंतर्गत विविध लाभ मिळावेत, अशी मागणी करणारे निवेदन दिव्यांग शिष्टमंडळाने मंत्री राणे यांना सादर केले. या निवेदनाचे अवलोकन करत जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.
जिल्ह्यातील ग्रामसेवक संघटनेच्या शिष्टमंडळानेही आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. ग्रामसेवकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी लवकरच सर्व ग्रामसेवकांची बैठक आयोजित करण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.