Nitesh Rane 
सिंधुदुर्ग

Nitesh Rane| शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे

हत्ती प्रश्न, दुष्काळ, धरणे अन् काजू अनुदानावर पालकमंत्र्यांचे भाष्य

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘ओंकार’ हत्तीच्या बंदोबस्तासंदर्भात तज्ज्ञांची टीम बोलावण्यात आली असून ती जिल्ह्यात आल्यानंतर तिचा अभिप्राय घेऊन योग्य निर्णय घेतला जाईल. तसेच खरीप व रब्बी पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतला जाईल आणि नरडवे, शिरशिंगे व सरमळे धरण प्रकल्पांना गती देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. यावेळी त्यांनी आ. जयंत पाटील यांच्याशी संबंधित काजू कारखान्याच्या सबसिडीच्या मुद्द्यावरूनही जोरदार टीका केली.

सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हत्तीचा प्रश्न हा जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय असून वनखाते त्यावर दिवस-रात्र मार्ग काढत आहे, असे पालकमंत्री राणे यांनी सांगितले. कालच जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात बैठक घेऊन हत्तीला कसे हाताळायचे आणि कोणती पावले उचलायची, यावर चर्चा झाली. एकदमच कोणतीही कारवाई केल्यास इजा होण्याची शक्यता असते; त्यामुळे लोकांच्या भावनेचा आदर राखून या प्राण्याला सुरक्षित व योग्य ठिकाणी कसे नेता येईल, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. काही वेळा प्राणीप्रेमींकडून वेगळ्या पद्धतीच्या प्रयत्नांना विरोध होतो, त्यातून मधला मार्ग काढून संवेदनशीलपणे यश मिळवले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच आ. केसरकर यांनी मांडलेल्या ‘हत्तीग्राम’ संकल्पनेवरही सर्वांना एकत्र घेऊन काम सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

रब्बी हंगाम धोक्यात, शेतकऱ्यांनी चिंता करू नये

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप हंगामासोबतच रब्बी पीक, कुडाळ, मालवण, कणकवली येथील भाजीपाला तसेच वेंगुर्ला व सावंतवाडी येथील वायंगणी भातशेती धोक्यात आली आहे. याबाबत बोलताना नितेश राणे म्हणाले की, जिल्हा ‘ट्रिगर वन’ मध्ये असल्याने शासन अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून आहे. मुख्यमंत्री आणि उपसमितीचे अध्यक्ष बावनकुळे यांच्यासह मी स्वतः या समितीचा सदस्य असून शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. बारामती ॲग्रोच्या माध्यमातून तंत्रज्ञांची मदत घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सुरू असून शेतकऱ्यांनी धीर धरावा आणि निश्चिंत राहावे, शासन खंबीरपणे त्यांच्या पाठीशी आहे, असे आवाहन त्यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT