कणकवली : भारतीय जनता पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर सावंत यांची एकमुखाने फेरनिवड झाली असून त्यांनी केलेल्या कामाची ही पोचपावती आहे. त्यांच्या कारकीर्दीत लोकसभेपासून विधानसभेपर्यंत भाजपने यश मिळविले. आपणाला शस्प्रतिशत भाजप म्हणून काम करायचे आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जरी महायुतीने लढविल्या जाणार असल्या तरी भाजप म्हणून सर्व जागांवर लढण्याची तयारी असणे आवश्यक आहे. त्यासाठी आतापासुनच कार्यकर्त्यांनी सज्ज व्हायला हवे. आगामी निवडणुकांमध्येही जिल्ह्यात भाजप-महायुतीचाच झेंडा फडकेल, असा विश्वास सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांनी व्यक्त केला.
प्रभाकर सावंत यांचा भाजप जिल्हाध्यक्षपदी फेर निवड झाल्याबद्दल कणकवलीत प्रहार भवनमध्ये मंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते शुक्रवारी सत्कार करण्यात आला. माजी आ.अजित गोगटे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत, रणजित देसाई, अशोक सावंत, मनोज रावराणे, संदीप साटम, दिलीप तळेकर, मिलिंद मेस्त्री आदी उपस्थित होते.
ना. राणे म्हणाले, जिल्हाध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा एकमुखाने निवड होणे हा प्रभाकर सावंत यांनी मिळविलेला विश्वास आहे. त्यांच्या संघटनात्मक कामामुळेच त्यांना पुन्हा ही संधी देण्यात आली आहे. त्यांचा भाजपच्या जिल्हा कार्यकारणीतही सत्कार केला जाईल. जिल्ह्यात भाजप संघटना जोमाने वाढवत असताना महायुतीचा धर्मही आम्ही पाळत आहोत. वरिष्ठ ठरवतील त्यानुसार आपल्याला काम करावयाचे आहे.
पुढील काळात होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे. मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री म्हणून आपण सर्वांच्या पाठीशी आहे. विरोधकांना येणार्या निवडणुकांमध्ये उमेदवारही उभे करायला मिळणार नाहीत. जनहिताचे अनेक उपक्रम राबवून भाजप जनतेच्या जवळ आहे.
येणार्या काळातही जास्तीतजास्त विकासकामे राबवली जातील, कार्यकर्त्यांना ताकद दिली जाईल अशी ग्वाही ना.राणे यांनी दिली. अजित गोगटे, मनिष दळवी, श्वेता कोरगावकर यांनीही शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन संदीप साटम यांनी केले. आभार रणजित देसाई यांनी मानले.
सर्वांच्या सहकार्यामुळेच भाजपने हे यश मिळविले. या पुढे ही एकदिलाने काम करून अधिक चांगले यश मिळवुया. पालकमंत्री म्हणून नीतेश राणे चांगल्या प्रकारे सत्तेच्या माध्यमातून विकासकामे करत आहेत. प्रथम राष्ट्र, मग पक्ष नंतर मी या धोरणानुसार काम करायचे आहे. येत्या काळातही जनतेला अपेक्षीत असे काम करूया.प्रभाकर सावंत, भाजपचे नूतन जिल्हाध्यक्ष