Nitesh Rane 
सिंधुदुर्ग

Nitesh Rane| कोकण रेल्वे प्रवाशांच्या मागण्या पूर्ण करणार

पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही : कणकवली रेल्वेस्थानकावर प्रवासी शेडसह विविध कामांचा शुभारंभ

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : मुंबईतून कोकणात आणि कोकणातून मुंबईत येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांसाठी कोकण रेल्वे ही महत्त्वपूर्ण वाहतूक सेवा आहे. कणकवलीसह जिल्ह्यातील सर्वच रेल्वे-स्थानकांवर प्रवाशांची गैरसोय होणार नाही यासाठी आमचे प्रयत्न आहेत. खा. नारायण राणे यांच्या माध्यमातून रेल्वे प्रवाशांच्या सर्व मागण्या टप्प्याटप्प्याने पूर्ण केल्या जातील, अशी ग्वाही पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.

कणकवली रेल्वेस्थानकावर फलाट क्र. २ वरील प्रवासी निवाराशेडचे लोकार्पण तसेच ज्येष्ठांसाठी लिफ्ट सुविधा आणि कोच इंडिकेटरचा शुभारंभ मंत्री राणे यांच्या हस्ते शुक्रवारी झाला. कोकण रेल्वेच्या रत्नागिरी मंडलचे व्यवस्थापक शैलेश बापट, उपमुख्य कार्यकारी अभियंता संजय किल्लेदार, आरपीएफचे अधिकारी गोकुळ सोनवणे, रेल्वे पोलिस निरीक्षक राजेश सुरवाडे, कणकवली सभापती हर्षदा वाळके, उपसभापती राजेश सावंत, जि. प.सदस्या सुप्रिया मेस्त्री, पं. स. सदस्य प्रदीप गावडे, सहदेव खाडये, बंडू हर्णे, नगरसेवक राकेश राणे, स्वप्निल राणे, मेघा गांगण, भाजप शहराध्यक्ष अण्णा कोदे, सेवानिवृत्त अभियंता अजयकुमार सर्वगोड, सेवानिवृत्त तहसीलदार आर. जे. पवार आदी उपस्थित होते.

ना. राणे म्हणाले, कणकवली रेल्वेस्थानकावर प्लॅटफॉर्मवर निवाराशेड व्हावी, अशी मागणी प्रवासी संघटना आणि प्रवाशांकडूनही सातत्याने होत होती, याबाबत आम्ही कोकण रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत होतो, त्याला यश आले आहे. खा. नारायण राणे यांच्या माध्यमातून कोकण रेल्वेस्थानकांवर प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात, त्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी आमचे प्रयत्न आहेत. टप्प्याटप्प्याने उर्वरित प्लॅटफॉर्मवर निवाराशेडसह आवश्यक सुविधा दिल्या जातील, अशी ग्वाही पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.

कोकणच्या हापूसची ओळख कोणीही पुसू शकत नाही

पालकमंत्र्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. कोकणातील हापूसच्या जीआय मानांकनाबाबत बोलताना ते म्हणाले, कोकणचा हापूस जगप्रसिद्ध आहे, कोणी कितीही दावा केला तरी कोकणच्या हापूसची ओळख कोणीही पुसू शकत नाही, त्यामुळे हापूसच्या जीआय मानांकनाबाबत योग्य ती बाजू मांडली जाईल. आमच्या हापूसची बरोबरी कोणीही करू शकत नाही, असे मंत्री राणे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT