सावंतवाडी : वादळी वाऱ्याने सावंतवाडी तालुक्यात अतोनात नुकसान झाले असून, महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार शहर व तालुक्यात मिळून एकूण २५ लाखांपर्यंत नुकसानीचा आकडा गेला आहे. ज्या नुकसानग्रस्त भागाची मी पाहणी केली ते पाहता पंचनाम्यापेक्षा जास्त नुकसान झालेले दिसते. त्यामुळे जिल्हाधिकारी व प्रशासनाशी बोलून जास्तीत– जास्त भरपाई कशी देता येईल, शासनाच्या निकषामध्ये बसवून लोकांना अधिकची भरपाई कशी मिळेल, वेळ पडली तर निकषाबाहेर जावून यावर काम करावे लागेल. शेवटी सरकार म्हणून मदत देणे,लोकांना आधार देणे आमची जबाबदारी आहे. सरकार म्हणून जास्तीत –जास्त मदत देण्याची भूमिका राहील, असे आश्वासन पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.
पालकमंत्री नितेश राणे यांनी शनिवारी शहरतील नुकसानीची पहाणी केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आ.दीपक केसरकर, .सिधुदुर्ग बँक अध्यक्ष मनिष दळवी, नगराध्यक्षा श्रध्दाराजे भोंसले, लखमराजे भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड.अनिल निरवडेकर, नगरसेविका मोहिनी मडगावकर, दिपाली भालेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
नाम.राणे म्हणाले, वादळी वाऱ्याने सावंतवाडी तालुक्यात जे नुकसान झाले आहे त्याबाबत मदत देण्यासाठी लवकरच ठोस कार्यवाही करू. जिल्हाधिकारी मान्सूनपूर्व कामाची आढावा बैठक लवकरच घेतील, त्यानुसार नियोजन सुरु आहे. नगराध्यक्षा श्रध्दाराजे भोंसले यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी शहरात महावितरण व संबंधीत विभागाची बैठक घेऊन आदेश दिले आहेत. गेल्यावर्षी १५ मे ला पाऊस आला होता. मात्र आता वातावरणात जे बदल दिसत आहेत त्यावरुन कदाचित पाऊस लवकर येण्याची चिन्हे आहेत. सागरी किनारपट्टीचा हा जिल्हा आहे, त्यामुळे पूर्व तयारीच्या कामाला प्रशासन लागले आहे. नैसर्गिक आपत्ती यंत्रणा कार्यान्वित केली जाईल. पुढच्यावेळी अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी अगोदर तयारीला लागून कमीत कमी नुकसान कसे होईल याची काळजी घेऊ असे ना. राणे म्हणाले.
जिल्ह्यातील प्रमुख नद्यांमधील गाळ काढण्याचे आदेश आपण दिले आहेत. जलसंपदा, महसूल विभाग यांनी यंत्रणा राबवायची आहे. काढलेल्या गाळाचे काय करावे याचे धोरण निश्चित आहे. त्याची रॉयल्टी भरुन घेऊन तो मुद्दा सोडविला जाईल. पालकमंत्री म्हणून माझा प्रशासनावर लक्ष आहे, समन्वय आहे असे मंत्री राणे यांनी सांगितले. कोकणातील शेतकरी, आंबा बागायतदार यांना आम्ही मदत करत आहोत. त्यांना निकषात मदत देण्याची आमची भूमिका आहे. वातावरणातील बदल आमच्या हातात नाहीत, मात्र सरकार म्हणून आम्ही निश्चित मदत करु असे आश्वासन नाम.राणे यांनी दिले.