कणकवली : आताच्या बदलत्या काळातही वृत्तपत्रांचे महत्व तेवढेच अबाधित आहे. वाचक म्हणून आणि एक राजकीय पक्षाचा समाजात काम करणारा कार्यकर्ता म्हणून तर माझ्या दृष्टीने सर्वात जास्त विश्वासार्ह पत्रकारिता ही वृत्तपत्रांची आहे. ही विश्वासार्हता जपण्याची जबाबदारी पत्रकारांची आहे. पत्रकारितेत आपले सिध्दांत बाजूला ठेवू नका. पत्रकारांचे कामाच्या धावपळीत आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांसाठी दर तीन महिन्याला विशेष आरोग्य शिबिर आयोजित केले जाईल. तसेच ओऱोस येथे दर्पण गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून पत्रकारांसाठी घरे माफक दरात उपलब्ध केली जातील, अशी घोषणा मत्स्य व बंदरे विकास तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नीतेश राणे यांनी केली.
कणकवली येथील स्वामी विवेकानंद सभागृह येथे शनिवारी कणकवली तालुका पत्रकार संघ आयोजित पुरस्कार वितरण सोहळा पालकमंत्री नीतेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न् झाला. यावेळी कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर , सभापती हर्षदा वाळके, उपसभापती सोनु सावंत , पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर , परिषद प्रतिनीधी गणेश जेठे , माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत , तालुकाध्यक्ष भगवान लोके , जिल्हा उपाध्यक्ष संतोष राऊळ , जिल्हा प्रतिनीधी लक्ष्मीकांत भावे , सचिव संजय सावंत, खजिनदार रोशन तांबे यांच्यासह तालुक्यातील पत्रकार, लोकप्रतिनिधी, वाचक आणि कणकवलीतील नागरीक उपस्थित होते.
या पुरस्कार वितरण सोहळ्यात आचार्य बाळशास्त्री जांभेकर, ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार संजय माळवदे, ज्येष्ठ पत्रकार कै. शशी तायशेट्ये उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार चंद्रशेखर देसाई , कै. अनिल सावंत स्मृती ग्रामीण पत्रकार पुरस्कार संतोष पाटणकर तर उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार प्रथमेश जाधव, यशस्वी उद्योजक पुरस्कार संदीप चौकेकर , सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार उत्तम पुजारे ,वृत्तपत्र कर्मचारी सन्मान पुरस्कार भास्कर रासम यांना पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच वृत्तपत्र विक्रेते मालोजी कोकरे , अरविंद मुद्राळे , बाळा फोंडके , खारेपाटण येथील कै. सौ. विणा राजेंद्र ब्रह्मदंडे यांच्या मरणोत्तर अवयव दानाबद्दल पती राजेंद्र ब्रह्मदंडे, दर्पण गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संतोष राऊळ यांचा विशेष सन्मान पत्रकार संघाच्यावतीने करण्यात आला.
मंत्री राणे म्हणाले , समाज बदलण्याची ताकद पत्रकारितेत आहे. समाजामध्ये मस्तावलेल्या , झोपलेल्या व्यस्थेला जागे करण्याचे काम पत्रकार करतात. पत्रकारिता करताना परिपूर्ण माहिती घेवून बातमी करा. असे सांगतानाच कणकवली तालुका पत्रकारसंघाच्या विविध सेवाभावी उपक्रमांचे मंत्री राणे यांनी कौतूक केले.
सभापती हर्षदा वाळके म्हणाल्या , आजच्या सोशल मिडीया आणि इलेक्ट्रॉनिक पत्रकारीतेच्या जमान्यातही प्रिंट मीडियाचे महत्व तसूभरही कमी झालेले नाही. समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम पत्रकार करतात. पत्रकारांमधील संवेदनशीलता हीच एक सामाजिक बांधिलकी आहे. नगराध्यक्ष संदेश पारकर म्हणाले , कणकवली तालुका पत्रकार संघ सामाजिक बांधिलकी जोपासून काम करत आहे. पालकमंत्री नितेश राणे हे येथील समस्यांवर चांगले काम करत आहेत. उपजिल्हा रुग्णालय आरोग्य समस्या, टोलमुक्ती यासह विविध निवेदने त्यांना दिले. तरुण वयातच सत्तेचे अधिकार त्यांना मिळाल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकासाला अधिक मदत होईल.
यावेळी पत्रकारसंघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर, परिषद प्रतिनिधी गणेश जेठे यांनीही मनोगत व्यक्त करत पत्रकारसंघाच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक भगवान लोके यांनी करताना पत्रकार संघाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. चंद्रशेखर देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले. परदेश शेतकरी दौर्याबद्दल भाई चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन राजेश कदम व राजन चव्हाण यांनी केले. आभार सचिव संजय सावंत यांनी मानले.