Nitesh Rane   (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Nitesh Rane : बंद घरे पुन्हा उघडण्यासाठी मेहनत घेतोय!

रोजगार निर्मितीचे प्रकल्प उभारणार ;‌‘त्या‌’ कार्यकर्त्यांना पदे देणार ; अपक्षांना पाठिंबा नाहीच

पुढारी वृत्तसेवा

गणेश जेठे

सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या कोकणामध्ये रोजगार निर्मितीचे प्रकल्प उभारण्यासाठी पूर्णपणे सहकार्य करत आहेत. अजुनही सत्तेतील चार वर्षे शिल्लक असून हा मोठा कालावधी आहे. जे प्रकल्प वर्षभरात आम्ही नियोजीत केले आहेत, ते सर्व प्रकल्प पुढील तीन चार वर्षात कोणत्याही परिस्थितीत पूर्ण केले जाणार आहेत. आज रोजगारासाठी जो तरूण बाहेर शहरांकडे गेला आहे तोच तरूण पुन्हा आपल्या गावातल्या घराकडे निश्चितपणे येईल आणि गावातली बंद घरे पुन्हा उघडतील. यासाठी जितकी मेहनत घेता येईल आणि सत्तेची ताकद वापरता येईल तेवढी वापरत आहे. यासाठी जशी केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार सत्तेवर आहे तशी सत्ता सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्येही भाजप महायुतीची यावी यासाठी आम्ही सर्व महायुतीतील पक्ष एकत्र येवून काम करत आहोत आणि त्यात आम्हाला निश्चितपणे यश मिळेल, असा विश्वास राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री आणि सिंधुदुर्गचे जिल्ह्याचे पालकमंत्री, भाजपचे नेते नितेश राणे यांनी दै. पुढारीशी बोलताना व्यक्त केला आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्याच्या विकासाबाबत आणि रोजगार निर्मितीबाबत आपले धोरण आणि काम स्पष्टपणाने मांडले. अर्थात रोजगार निर्मितीच्या मुद्यावर त्यांनी अधिक वेळ चर्चा केली. येणाऱ्या चार वर्षामध्ये रोजगार निर्मितीचे किमान दोन तरी मोठे प्रकल्प आपण निश्चितपणाने उभारणार अशी ठामपणे ग्वाही त्यांनी दिली. अर्थसंकल्पामध्ये ज्या तरतुदी झाल्या त्या तरतुदींचा उपयोग मोठ्या प्रमाणात कोकणामध्ये रोजगार निर्मितीसाठी होणार आहे. मत्स्य उत्पादन वाढण्यासाठी मदत होईलच, त्याबरोबरच नारळ, आंबा, काजू, कोकम या फळ पिकांचे उत्पन्न वाढेल. त्यासाठी ज्या योजना निर्माण होतील त्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी कोकणात आम्ही करू आणि ही अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये महायुतीची सत्ता असणे आवश्यक आहे.

आजवरचा विकास आम्ही केला

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जो विकास झाला तो खासदार नारायण राणे यांनी केला आहे. अनेक सुविधा आणि सोयी त्यांनी जिल्हावासीयांसाठी उपलब्ध केल्या. जिल्ह्यातील जे चांगले रस्ते दिसत आहेत त्याचे श्रेय आम्हालाच जाते. अनेक गावे मोठ्या पुलांनी जोडली गेली आहेत, त्याचेही श्रेय खा.राणे यांना जाते. केवळ शहरे नाहीत तर ग्रामीण भागातही विकासाची गंगा वाहते आहे. यापुढेही सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी अहोरात्र मेहनत घेण्याची आमची तयारी आहे. सत्तेची ताकद वापरून लोकांचा विकास करायचा असेल तर आम्हाला मेहनत ही घ्यावीच लागणार असेही त्यांनी स्पष्ट केले.

विरोधकांनी संधी गमावली

विरोधक बॅकफुटवर आहेत. कारण त्यांनी जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेमध्ये लक्ष घातला नाही. त्यांच्याकडेही सत्ता होती. परंतु त्या सत्तेच्या ताकदीचा वापर करून जो विकास करायला हवा तो केला नाही. कारण त्यांच्याकडे तसे व्हिजन नव्हते की नियोजनही नव्हते. केवळ सत्ता उपभोगण्याचा प्रयत्न झाला. विरोधकांना विकासाची संधी गमावली. त्यामुळे लोकांनी पुन्हा एकदा आम्हाला सत्ता दिली. पुढील सत्तेचा चार वर्षांचा काळ हा आमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. या संधीचे सोने करण्याचा आटोकाट प्रयत्न आम्ही करतो आहोत. त्यामुळे पटापट निर्णय घेवून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. वेंगुर्लेचा ताज प्रकल्प असेल किंवा वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्ग असेल की विजयदुर्ग बंदराचा विकास असेल हे प्रकल्प लवकरात लवकर सुरू होणार आहेत. वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाला तर लागणारा सर्वच साडेसहा हजार कोटींचा निधी तरतुद होतो आहे. असे असताना हा प्रकल्प युध्दपातळीवर सुरू होईल. जेव्हा कोल्हापूर आणि कोकण या रेल्वे मार्गाने जोडला जाईल तेव्हा रोजगाराच्या क्षेत्रामध्ये कितीतरी मोठी क्रांती होईल. याची पूर्ण जाणीव आम्हाला असल्यामुळे हा प्रकल्प आम्ही पूर्ण करण्यासाठी झटतो आहोत असेही पालकमंत्री नितेश राणे म्हणाले.

स्वच्छ व सुंदर जिल्हा

जेव्हा जिल्हा परिषदेवर आमची सत्ता येईल तेव्हा सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असल्यामुळे हा जिल्हा स्वच्छ आणि सुंदर कसा बनेल यावर आम्ही युध्दपातळीवर काम करणार आहोत. त्यासाठी अनेक उपक्रम आणि अभियान आम्ही राबवणार आहोत. प्लॅस्टीकमुक्त सिंधुदुर्ग जिल्हा कसा होईल यासाठी आमचे प्रयत्न सतत सुरू राहणार आहेत. मुळातच सिंधुदुर्ग जिल्हा स्वच्छ जिल्हा असून तो आणखी स्वच्छ करणे आणि सुंदर बनविणे यावर आमचे काम आहे. आज देवगड-निपाणी रस्ता असो की तळेरे-कोल्हापूर रस्ता असो या रस्त्यांची कामे युध्दपातळीवर सुरू आहेत. तळेरे-विजयदुर्ग रस्त्याचेही काम चालू आहे. त्यामुळे आताच या रस्त्यांच्या दुतर्फा फुलझाडे लावण्याची मोहीम हाती घेण्यात येत आहे आणि तशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. हा संपूर्ण जिल्हा एखाद्या गार्डनप्रमाणे सुंदर दिसावा म्हणून प्रयत्न आहेत. कारण पर्यटक या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात यायला लागले आहेत. पर्यटन व्यवसाय वाढवायचा असेल तर मुळात निसर्गरम्य असलेला आपला सिंधुदुर्ग जिल्हा अधिक सुंदर आणि स्वच्छ करावाच लागेल असेही पालकमंत्र्यांनी नमुद केले.

शाळा आणि आरोग्याचा दर्जा सुधारणार

मला कल्पना आहे की जिल्हा परिषद ही जी यंत्रणा आहे ती शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रामध्ये फार मोठे काम करू शकते. ग्रामीण भागात शाळेत शिकणाऱ्या गावांमधील मुलांना अधिक दर्जेदार शिक्षण दिले जावे याकडे आम्ही गांभिर्याने लक्ष देत आहोत. विशेषत: सोलर सारखी योजना राबवून शाळांवर होणारा जो खर्च आहे तो कमी करण्यासाठीही आम्ही नियोजन केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची गुणवत्ता ही राज्याच्या तुलनेत सर्वात वर असून ती यापुढेही अधिक उंचीवर जावी यासाठी जिल्हा परिषदेच्या योजनांचा वापर प्रभावीपणे केला जाईल. आरोग्य यंत्रणेच्या बाबतीत काही समस्या निश्चितपणे आहेत. त्या दुर करण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करतो आहोत. ग्रामीण भागातील आरोग्य मंदिरे अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषदेची यंत्रणा ताकदीने काम करेल आणि आरोग्याचा दर्जा सुधारेल यासाठी आम्ही कंबर कसून कामाला लागलो आहोत असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास

सर्व प्रकारची सत्तास्थाने आमच्याकडे आहेत. सत्तेची ताकद आमच्याकडे आहे. हे लक्षात घेवुनच सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने कोणतीही कसर सोडायला मी तयार नाही. त्यामुळे राजकारण करता करता एक मंत्री म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व प्रकारचे प्रकल्प आणि योजना आपण हाती घेतल्या आहेत. संपूर्ण जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हा ध्यास घेवून मी अहोरात्र काम करत आहे. त्यासाठी लोकांची साथ मिळते आहे. देशात आणि राज्यात भाजपची जी सत्ता आहे त्या सत्तेची ताकद वापरून एकेक काम पूर्ण करण्याचा विडा मी उचलला आहे. पुढच्या चार वर्षात महाराष्ट्रात एक सर्वांगीण विकसित जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा आणखी दमदारपणे वाटचाल करेल असा विश्वासही मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.

अपक्षांना पाठिंबा नाहीच

अपक्षांना पाठिंबा नाहीच असे त्यांनी पुन्हा एकदा दै. पुढारीशी बोलताना ठणकावून सांगितले. खा.राणे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत महायुती ही निवडणूक लढवत आहे. विरोधक निष्प्रभ ठरले आहेत. महायुतीवर विश्वास ठेवल्याने अनेक जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. सर्व विचारविनिमय करून जागा वाटप आणि उमेदवाऱ्या दिल्या आहेत. त्यानुसार युध्दपातळीवर प्रचार सुरू आहे. त्यात भाजप महायुतीला प्रचंड मोठे यश मिळेल यात शंका नाही. अशी स्थिती असताना काही अपक्षांनी अर्ज कायम ठेवून ते निवडणुका लढवत आहेत. परंतु त्यांना पक्षाचा कोणताही पाठिंबा नाही. जे अधिकृत उमेदवार आहेत तेच विजयी होतील असेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT