सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस पडत आहे. नैसर्गिक आपत्ती या अचानक येत असल्या तरी संभाव्य आपत्तींना यशस्वी सामोरे जात त्यातून होणार्या हानीचे प्रमाण कमी करण्यासाठी सदैव दक्ष राहावे; सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून मदतकार्य आणि माहितीचे आदानप्रदान गतीने करावे, सर्व यंत्रणांनी एक टीम म्हणून कर्तव्यभावनेने ‘अलर्ट मोड’वर काम कराव, असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी अधिकार्यांना दिले.
मान्सूनपूर्व पावसाळामुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा व जनजीवन सुरळीत होण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांसाठी मंत्री नीतेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक शनिवारी झाली. जिल्हाधिकारी अनिल पाटील, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक दिवे, प्रभारी पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, अति.जिल्हाधिकारी स्वाती साठे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीश राऊत, सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष मनिश दळवी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री राणे म्हणाले, पावसामुळे वीज संबंधित अनेक तक्रारी प्राप्त आहेत. यासाठी वीज अधिकार्यांनी अधिक सतर्क राहावे. कर्मचार्यांनी अलर्ट राहून वीज पुरवठा सुरळीत राहिल याची दक्षता घ्यावी. भविष्यात महावितरणच्या दुरूस्ती कामांसाठी विशेष पॅकेज आणणार असून या पॅकेजमधून जिल्ह्यतील वीजेचा प्रश्न कायमचा सोडविण्यात येईल. तसेच डिसेंबरअखेर भूमिगत वीज जोडणीचे काम पूर्ण करण्यात येईल.
पावसामुळे अनेक रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे, पुलांच्या अर्धवट कामांमुळे अनेक गावांचा वाहतूक संपर्क तुटली आहे. ही कामे तात्काळ पूर्ण करावीत. संबंधित अधिकार्यांनी प्रत्यक्ष कामांच्या ठिकाणी नियमित भेटी देत कामांचा आढावा घ्यावा. कामाच्या दर्जाबाबत मात्र तडजोड सहन केली जाणार नाही. घाट क्षेत्रात दरडी कोसळल्यास संबंधित यंत्रणांनी तात्काळ कोसळलेली दरड बाजूला करुन घाट रस्ता सुरू करावा. कंत्राटदारांनी त्या ठिकाणी मनुष्यबळ तैनात ठेवावे. ज्या ठिकाणी वारंवार दरडी कोसळतात अशा ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
रस्त्यांवर पडलेले झाड त्वरित हटविण्यासाठी योग्य नियोजन करावे. रस्त्यांलगती धोकादायक झाडे, फांद्या बाजूला कराव्यात. एसटी विभागाने देखील पावसामुळे प्रवाशांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. नगरपालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामे तात्काळ हाती घ्यावीत, जेणेकरुन स्वच्छता राहिल. नगरपालिका अखत्यारीतील रस्त्यांची कामे पूर्ण करावीत. मान्सून कालावधीत नगरपालिका क्षेत्र स्वच्छ राहिल याची दक्षता घ्यावी. नागरिकांना शुध्द पाणीपुरवठा करावा. अधिकारी व कर्मचार्यांनी नियमीत बैठक घेवून आपत्कालीन परिस्थिती नियोजनाबाबत विचार विनिमय करावा, असेही निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
आरोग्य यंत्रणेविषयी बोलताना पालकमंत्री म्हणाले, पावसाळा कालावधीत साथीच्या आजारांचे नियंत्रण करण्यासाठी नियोजन करावे, अस्वच्छतेमुळे कोणतेही आजार पसरणार नाहीत यासाठी आरोग्य यंत्रणांनी सतर्क राहावे, कोविडच्या अनुषंगाने नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी, याविषयी जनजागृती करावी, अशा सूचना यावेळी दिल्या.