मळगांव ः वेंगुर्ले तालुक्यातील आडेली जिल्हा परिषद गटात सात ग्रांमपचायतीचा समावेश आहे. या सातही ग्रामपंचायतीचे सरपंच भाजपचे आहेत. त्यामुळे या मतदारसंघाला निधीची कमतरता कधी पडली नाही. या पुढेही ती पडू देणार नाही. मनिष दळवी यांनी नेतृत्व व निष्ठा काय असते, याचे उदाहरण सेट केले आहे. त्यांच्यावर खा. नारायण राणे यांचे विशेष प्रेम आहे. त्यामुळे त्यांची चिंता करू नका. अनाकलनीय परिस्थितीमुळे महायुतीतर्फे दोन अपक्ष उमेदवार आणि भाजपच्या कमळ चिन्हावर एक उमेदवार आम्ही रिंगणात उतरविले आहेत. या मतदारसंघाच्या विकासची जबाबदारी माझी आहे, अशी ग्वाही पालकमंत्री नितेश राणे यांनी आडेली येथील प्रचार सभेत दिली.
आडेली जिल्हा परिषद गटातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. श्री देव चव्हाटा मंदिर पटांगणावर झालेल्या या प्रचारसभेला आ. दीपक केसरकर, भाजपचे शरद चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनीष दळवी, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव एम. के.गावडे, वेंगुर्ले नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, भाजपा तालुकाध्यक्ष विष्णू परव, शिवसेना तालुकाप्रमुख सचिन देसाई, आडेली मतदारसंघाच्या उमेदवार समिधा नाईक, पं. स. चे उमेदवार नितीन मांजरेकर, वायंगणी गणाच्या उमेदवार शीतल राऊत-बांदवलकर, आडेली सरपंच यशस्वी कोडसकर, उपसरपंच परेत हटणकर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री राणे म्हणाले, केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार आहे. जिल्हयातीत सर्वच नगरपालिका, नगरपरिषदावरही महायुतीचीच सता आहे. जिल्हा बँकचा कारभारही मनिष दळवी यांच्य सक्षम नेतृत्वाखाली सुरू आहे. त्यामुळे या जिल्हयाचा विकासाचा मेरु कोणीही रोखू शकणार नाही. तुम्ही फक्त महायुतीचेच उमेदवार निवडून घ्या. मतदारसंघातील एकाही गावातील एकही विकास काम शिल्लक राहणार नाही, याची ग्वाही मी तुम्हाला देतो. मनिष दळवी हे जरी आता आडेलीचे उमेदवार नसले, तरी 2029 पर्यंत थांबा, ते फार उंचीवर जाणारे नेतृत्व आहे.
आ. दीपक केसरकर म्हणाले, समिधा नाईक या जिल्हा परिषदेसाठी सक्षम उमेदवार आहेत. यापूर्वी जि. प. अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांची कार्यकुशलता आम्ही पाहिली आहे. नितीन मांजरेकर हे सुद्धा काम करणारे कणखर नेतृत्व आहे. त्यांनी आडेली मतदारसंघात असंख्य कामे केली आहेत. आमचे हे दोन्ही उमेदवार वेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढवत असले, तरी ते महायुतीचेच घटक आहेत. शीतल राऊत या भाजप चिन्हांवर वायंगणी पंचायत समितीतून निवडणूक लढवत आहेत. तळागाळातील जनतेच्या प्रश्नांची त्यांना जाण असल्याने त्या पदाला योग्य न्याय देतील, याची आम्हाला खात्री आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सचिन वालावलकर, नगराध्यक्ष दिलीप गिरप, शीतल आगचेकर, उमेदवार समिधा नाईक, नितीन मांजरेकर यांनीही मार्गदर्शन केले.