Nilesh Rane 
सिंधुदुर्ग

Nilesh Rane| आरोग्य सेवेत निष्काळजीपणा सहन करणार नाही!

आ. नीलेश राणे : कुडाळ-मालवणात दर ३ महिन्यांनी आरोग्याचा आढावा घेणार

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ : कुडाळ-मालवण तालुक्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करून नागरिकांना चांगली आरोग्य सेवा कशी देता येईल, याचे नियोजन करावे. आरोग्य सेवांचा दर्जा वाढविण्यासाठी तसेच आरोग्यविषयक समस्या तातडीने सोडविण्यासाठी एकात्मिक आरोग्य वर्धिनी समितीच्या माध्यमातून सातत्याने काम करायचे आहे. या समितीची दर तीन महिन्यांनी आढावा बैठक घेण्यात येईल, असे आ. नीलेश राणे यांनी सांगितले.

कुडाळ-मालवण तालुका एकात्मिक आरोग्य वर्धिनी समितीची पहिली बैठक शनिवारी कुडाळ पंचायत समिती सभागृहात आ. नीलेश राणे यांच्या उपस्थितीत झाली. कुडाळ सभापती मिलिंद नाईक, जि. प. उपाध्यक्ष दादा साईल, शिक्षण व आरोग्य समिती सभापती प्रितेश राऊळ, बांधकाम समिती सभापती संतोष साटविलकर, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूशे, कुडाळ तहसीलदार सचिन पाटील, मालवण तहसीलदार गणेश लव्हे, उपसभापती सिताराम तेली, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, गटविकास अधिकारी प्रवीण हिर्लेकर, कुडाळ तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर, मालवण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. धनगे यांच्यासह जि.प. सदस्य, अधिकारी व समिती सदस्य उपस्थित होते.

आ. राणे म्हणाले, शासनाच्या माध्यमातून एकात्मिक आरोग्य वर्धिनी समिती गठित करण्यात येत आहे. त्याअंतर्गत कुडाळ-मालवणची समिती गठित करण्यात आली असून, त्यामध्ये आमदार, खासदार, पंचायत समिती सभापती, नगराध्यक्ष यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी व अधिकारी अशा सुमारे ४० सदस्यांचा समावेश आहे. आज समितीची पहिली बैठक झाली असून, दर तीन महिन्यांनी आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यात येणार आहे. समिती सदस्यांनी आपल्या भागातील आरोग्यविषयक समस्या, अडचणी व आवश्यक उपाययोजनांबाबत सूचना मांडाव्यात. हे विषय बैठकीच्या अजेंड्यावर घेऊन त्यावर आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेशी संबंधित प्रश्न अधिक प्रभावीपणे मार्गी लावता येतील, असेही त्यांनी सांगितले.

आरोग्य सेवा तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे, आरोग्य सेवांचा दर्जा सुधारणे, नागरिकांचे आरोग्यमान उंचावणे आणि आरोग्य व्यवस्थेतील आवश्यक सुधारणा करणे हा या समितीचा प्रमुख उद्देश आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेत आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी उपलब्ध यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले.

सदस्य दीपक नारकर, दीपलक्ष्मी पडते व पाताडे यांनी आरोग्य विषयक समस्यांकडे लक्ष वेधले. रूपेश कानडे यांनी महिला व बाल रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करून देण्याची मागणी केली. बैठकीच्या प्रारंभी कुडाळ तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर यांनी समितीची स्थापना, रचना आणि कामकाजाबाबत प्रास्ताविकातून माहिती दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT