मालवण : कणकवली नगरपालिकेसाठी स्थापन शहर विकास आघाडीत सहभागी होण्याचा आम्ही विचार करत आहोत, आणी तो आम्ही का नाही करावा?, मित्र पक्षासोबत युतीसाठी शिवसेनेने सर्वांत आधी प्रस्ताव दिला. तुम्हाला परत परत सांगतोय, युतीसाठी सर्वात पुढे शिवसेनाच होती, मात्र आमच्याबरोबर काही लोकांना युती करायची नव्हती. पण काही अन्य लोकांना युती करायची होती, ती आता होणार आहे, असे सांगत शिवसेनेचे कुडाळ-मालवणचे आमदार नीलेश राणे यांनी कणकवलीत शहर विकास आघाडीसोबत जाण्याचे संकेत दिले.
मालवण येथे प्रसारमाध्यमांशी आ. राणे बोलत होते. आ. राणे म्हणाले, आता निवडणूक लागली आहे, शिवसेना पक्षाचा आमदार म्हणून मी इकडे काम करत आहे. शिवसेनेने मागच्या वर्षभरात संघटना बांधली आणि लोकांनी आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्या विश्वासावर आम्ही निवडणुकीत उतरलो आहोत. या निवडणुकीत सुसंस्कृत, पारदर्शक व निष्कलंक उमेदवार देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. ज्यांचा कधी कुठेही भ्रष्टाचारामध्ये नाव आलं नाही, नगरपालिका ज्याने उदरनिर्वाहाचे साधन समजलं नाही अशा लोकांना आम्ही उमेदवारी दिली आहे. लोकांच्या कोर्टात आम्ही आता जात आहोत. मालवण एक जागतिक दर्जाचे शहर बनत आहे. त्याला आकार, उकार देत एकविसाव्या शतकातील शहर बनविने व पारदर्शक कारभार कसा करता येईल, यावर आमचं लक्ष आहे. कोण आमच्या स्पर्धेत आहे, आमच्यावर कोण टीका करतो, त्यावर आम्ही लक्ष देत नाही. आमची स्पर्धा ही विकास प्रक्रिये सोबत आहे. या निवडणुकीत आम्ही कुणावरही टीका करणार नाही. या निवडणुकीच्या निकाला दिवशी शिवसेनेचे सर्व उमेदवार विजयी झालेले दिसतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आता युती होईल, असे वाटत नाही.ं जिल्ह्यात आमची ताकद मोठी आहे, तरीही जे आमच्या अस्तित्वाची चर्चा करतात, त्यांनी आमच्या विजयाचे फटाके आणि विजयाचा गुलाल बघण्यासाठी तयार रहावे. कोणी काय म्हणावं त्याच्याशी मला देणे-घेण नाही, माझं थेट लक्ष हे मालवणच्या विकासावर आहे. या लक्षापासून मी तसूभरही हलणार नाही, असे स्पष्टपणे आ. निलेश राणे यांनी सांगितले.