नीलेश राणे यांच्याविरोधात मालवणमध्ये गुन्हा दाखल 
सिंधुदुर्ग

Nilesh Rane : नीलेश राणे यांच्याविरोधात मालवणमध्ये गुन्हा दाखल

स्टिंग ऑपरेशन प्रकरण; सातजणांविरुद्ध तक्रार

पुढारी वृत्तसेवा

मालवण : मालवण येथील भाजपा पदाधिकारी विजय केनवडेकर यांच्या घरी गेल्या 26 तारखेला झालेल्या स्िंटग ऑपरेशनप्रकरणी आमदार नीलेश राणे यांच्यासह सातजणांविरोधात मालवण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे गुन्हे विविध कलमांखाली दाखल झाले आहेत. त्यामध्ये अनाधिकारे घरात प्रवेश करणे आणि समाजमाध्यमांमध्ये बदनामी करणे या गुन्ह्यांचा समावेश आहे.

दरम्यान, यामागे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असल्याचा थेट आरोप आ. नीलेश राणे यांनी केला असून, नीलेश राणे यांना बळीचा बकरा बनविला जात असल्याचा आरोप त्यांचे बंधू भाजपा नेते, पालकमंत्री नितेश राणे यांनी केला आहे. खा. नारायण राणे यांचे महत्त्व कमी करण्याचा कट रचला जात आहे, असा टोला माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनीही या दरम्यान लगावला आहे.

गेल्या बुधवारी आ.निलेश राणे यांनी मालवण येथील भाजपचे पदाधिकारी केनवडेकर यांच्या घरी प्रवेश करत त्यांच्या बेडरूममध्ये जात पैशाची बंडले असलेली एक बॅग समाजमाध्यमांना दाखवली होती. त्यासाठी त्यांनी लाईव्ह स्टींग ऑपरेशन केले होते. यावेळी भाजपचे पदाधिकारी बंड्या सावंत तिथे उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मालवणमध्ये येवून गेल्यानंतर भाजपकडून निवडणुकीसाठी हे पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप केला होता. निवडणूक अधिकारी आणि पोलिसांनाही तिथे बोलावून त्यांच्याकडे निवडणुकीला हे पैसे वाटप करत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मालवण पोलिस स्थानक आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जात याप्रकणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली होती. त्यासाठी ते सतत आग्रहीदेखील होते. परंतु आ.निलेश राणे यांच्या विरोधात मालवण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.

ज्या घरात स्टींग ऑपरेश झाले होते त्या घराचे मालक, भाजपचे पदाधिकारी विजय केनवडेकर यांनी मालवण पोलिस स्थानकात एफआयआर दाखल केला आहे. केनवडेकर यांनी आ.निलेश राणे, सिध्देश मालवणकर, आनंद शिरवलकर, प्रसाद यादव हे चारजण आणि अन्य अनोळखी तिघेजण अशी सातजणांविरूध्द तक्रार दिली आहे. या तक्रारीमध्ये त्यांनी या सातजणांनी माझ्या घरी जमाव करून अनाधिकारे प्रवेश करून माझ्या बेडरूममध्ये जावून, माझ्या बेडवर ठेवलेली माझ्या व्यवसायाच्यासंबंधी 20 लाख रू.ची रक्कम ही आगामी मालवण नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदारांना वाटण्यासाठी ठेवली असे खोटे पत्रकारांना सांगून माझी बदनामी केली आहे. या प्रकारामुळे मी आणि माझे कुटुंब मानसिक धक्क्यामध्ये होतो असेही केनवडेकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्यायसंहीता कलम 189 (1), 189 (2), 329(4) आणि 356 (2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी संध्याकाळपर्यंत याप्रकरणी कुणाला अटक झाल्याची माहिती हाती आली नव्हती. दरम्यान याबाबत अधिक माहिती देण्यास मालवण पोलिस अधिकारी तयार नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT