सिंधुदुर्ग जिल्ह्यात बेडकाची नवी प्रजात आढळून आली आहे. कोकणच्या भूमीवरुन संशोधकांनी या प्रजातीचे नामकरण ‘फ्रायनोडर्मा कोंकणी’ असे केले आहे. कुडाळ आणि मालवण तालुक्यातील पाणथळ आणि कातळ सड्यांवर या बेडकाचा अधिवास आहे.
दरम्यान, या शोधामुळे सिंधुदुर्गातील पाणथळ जागा आणि कातळ सड्यांवरील जैवविविधतेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे, अशी माहिती संशोधक डॉ. योगेश कोळी यांनी दिली.
कुडाळमधून शोधलेल्या नव्या प्रजातीच्या शोधाचे वृत्त नुकतेच ‘जर्नल ऑफ एशिया-पॅसिफिक बायोडायव्हर्सिटी’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाले आहे. या नव्या प्रजातींच्या संशोधनामध्ये शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा येथील संशोधक डॉ. ओमकार यादव, संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळचे डॉ. योगेश कोळी, दहिवडी कॉलेजचे संशोधक डॉ. अमृत भोसले, युनिव्हर्सिटी कॉलेज त्रिवेंद्रम संशोधन केंद्रातील डॉ. सुजित गोपालन, माय वे जर्नी ऑर्गनायझेशन संस्थेचे गुरुनाथ कदम, ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनचे अक्षय खांडेकर, झुलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे शास्त्रज्ञ डॉ. के.पी. दिनेश या संशोधकांचा समावेश आहे, असे डॉ.कोळी यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाणथळ जागांचे सर्वेक्षण चालू असताना ही प्रजाती शोधण्यात आली. बेडकाची ही प्रजात 2021 साली ठाकूरवाडी गावात असणार्या तलावात डॉ. योगेश कोळी यांना दिसून आली. या नवीन प्रजातीच्या शरीराचा आकार, डोक्याची रुंदी, पोटाकडील बाजूला असलेले त्वचीय प्रक्षेपण आणि पाठीवरील विशिष्ट रचनेमुळे ही प्रजाती वेगळी आहे हे सिद्ध करण्यात आले. त्याचप्रमाणे मायटोकॉन्ड्रियल 16ड ीठछअ जनुक आणि नुक्लियर टायरोसिनेज जनुकावर आधारित अभ्यासामध्ये ही प्रजाती नवीन असल्याचे सूचित झाले. या शोधामुळे भारत आणि बांगलादेश या दोन देशांमध्ये आढळणार्या ‘फ्रायनोडर्मा’ या बेडकाच्या वंशामध्ये भर पडून ‘फ्रायनोडर्मा कोंकणी’ या नवीन प्रजातीसह या वंशात आता एकूण पाच प्रजातींचा समावेश झाला आहे.
कोकण किनारपट्टीवरील सड्यांवर सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. या भागात अभ्यास झाल्यास अजून नवीन गोष्टींचा उलगडा होऊ शकतो. तसेच हवामान बदल आणि शहरीकरणामुळे होणार्या पर्यावरणीय बदलांचा परिणाम देखील बेडकांच्या एकूण जीवनावर होत आहे. त्यासाठी पाणथळ जागा व किनारपट्टी भागाताली कातळ सडे यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे.डॉ.ओमकार यादव, संशोधक