Konkan Railway  
सिंधुदुर्ग

Konkan Railway : कोकणवासीयांसाठी खुशखबर! मुंबई - सावंतवाडी दरम्यान धावणार नवी दैनिक एक्सप्रेस

कोकणवासीयांची गेल्या अनेक वर्षांची मागणी पूर्ण होणार

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : कोकणातील रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) ते सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनिक एक्स्प्रेस रेल्वे सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. या नव्या सेवेमुळे मुंबई, ठाणे, पनवेल परिसरातील सिंधुदुर्गसह कोकणवासीयांची गेल्या अनेक वर्षांची मागणी पूर्ण होणार आहे. शिवाय जिल्ह्याच्या पर्यटन तसेच उद्योग, व्यवसाय क्षेत्रालाही याचा लाभ होणार आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक १५०८७ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सावंतवाडी रोड एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक १५०८८ सावंतवाडी रोड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस ही गाडी दररोज धावणार आहे. सुमारे ५१० किलोमीटर अंतराच्‍या या रेल्वे प्रवासात प्रवाशांना कोकणातील निसर्गरम्य समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले आणि धार्मिक पर्यटनस्थळांचा लाभ घेता येणार आहे. प्रवासी सुविधा वाढविणे, रेल्वे संपर्क अधिक बळकट करणे आणि प्रादेशिक विकासाला गती देणे या उद्देशाने रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय घेतला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

कोकणातील संपर्क अधिक सुलभ

नव्‍या रेल्वे सेवेच्या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेश आणि कोकणातील महत्त्वाची शहरे व जिल्हे यांच्यातील रेल्वे संपर्क अधिक सक्षम होणार आहे. कोकण किनारपट्टीपर्यंतचा प्रवास अधिक सुलभ होण्यासोबतच प्रवाशांना आणखी एक विश्वासार्ह आणि थेट रेल्वे पर्याय उपलब्ध होईल, असे केंद्र सरकारने म्‍हटले आहे.

लवकरच वेळापत्रक होणार जाहीर

ही गाडी सुरू करण्यास रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. मात्र अद्याप नोटीफिकेशन जारी केलेले नाही. या नव्या रेल्वे फेरीचे नवे वेळापत्रक व शुभारंभ वेळ लवकरच जाहीर होईल. विशेषत: आगामी गणेशोत्सव लक्षात घेता चालू ऑगस्ट महिन्यातच ही फेरी कोकणवासीयांच्या सेवेत येईल, अशी अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT