बांदा : नेतर्डे-खोलबागवाडी येथे शनिवारी सकाळी मयुरी आनंद परब (वय 18) या महाविद्यालयीन तरुणीने घरातील तुळीला गळफास घेऊन जीवन संपविले. ही घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. सकाळी कुटुंबीयांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी स्थानिकांसह पोलिसांना माहिती दिली. तिच्या आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकले नाही.
घटनास्थळी सहा.पोलिस निरीक्षक गजेंद्र पालवे, पोलिस कर्मचारी सिद्धार्थ माळकर, टी. टी. कोळेकर आणि संगीता बोर्डेकर यांनी पंचनामा करून आवश्यक तपासकार्य सुरू केले. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयुरी ही पेडणे (गोवा) येथे बारावीत शिक्षण घेत होती. शुक्रवारी रात्री ती आई-वडिलांसोबत बांदा येथील जत्रेला गेली होती. जत्रेतून उशिरा घरी परतल्यानंतर जेवण करून ती झोपली. सकाळी 6.30 वा. च्या सुमारास वडील तिच्या खोलीत गेले असता ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. तिला तात्काळ कसारवर्णे (गोवा) येथील रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेहाचे बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. गजानन सारंग यांच्या उपस्थितीत विच्छेदन करण्यात आले.तिच्या मागे आई-वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बांदा पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.