नेरुर : अतिक्रमण हटविताना जेसीबी. Pudhari Photo
सिंधुदुर्ग

Illegal Encroachment Action | नेरूर-ठाकूरवाडीतील अतिक्रमण अखेर हटवले!

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील नेरुर -ठाकूरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या जागेवर तसेच सार्वजनिक वहिवाटीच्या रस्त्यावर गेल्या 13 वर्षांपासून असलेले अतिक्रमण अखेर बुधवारी पोलिस संरक्षणात हटवण्यात आले. आ. नीलेश राणे यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेनंतर प्रशासनाने धडक कारवाई करत हे अतिक्रमण दूर केले. या कारवाईमुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत आ. राणे व प्रशासनाचे आभार मानले.

नेरुर-ठाकूरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मालकी जागेत तसेच ये-जा करण्याच्या सार्वजनिक रस्त्यावर येथील दोन ग्रामस्थांनी अतिक्रमण केले होते. सन 2012 मध्ये शिक्षण विभागाने मोजणी करून हद्द निश्चित केली होती. मात्र, संबंधितांनी त्या मोजणीला न जुमानता जेसीबीच्या सहायाने खोदकाम करून नारळाची रोपे लावली व पत्र्याची शेड उभारली होती. परिणामी वाडीतील ग्रामस्थांचा सार्वजनिक मार्ग बंद होऊन त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. याबाबत शिक्षण विभागाकडून 4 डिसेंबर 2025 रोजी पुन्हा मोजणी करण्यात आली असता संबंधितांनी त्यास विरोध केला.

अखेर शिक्षण विभागाने ही बाब आ. नीलेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आ. राणे यांनी तत्काळ प्रशासनाला चौकशी करून रीतसर व कायदेशीर कारवाईचे आदेश दिले. प्रशासकीय आदेश प्राप्त होताच यंत्रणा कार्यान्वित झाली आणि अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली.

ग्रामस्थांची एकजूट ठरली निर्णायक

अतिक्रमण हटवताना ठाकूरवाडीतील ग्रामस्थांनी उल्लेखनीय एकजूट दाखवत श्रमदान केले. अक्षय शिंदे, जितेंद्र परब, प्रसाद परब, अमेय शिंदे, अंकुश जोशी, गौरव ठाकूर, अक्षय जोशी, रमेश जोशी, मोहन जोशी, काशिनाथ जोशी, सिद्धेश सामंत, राजन नाईक, संकेत वरक, संजय वरक, अमित ठाकूर, गणेश ठाकूर, अमोल ठाकूर, सिद्धेश ठाकूर, विजय ठाकूर, साईश ठाकूर, हर्षद ठाकूर, प्रथमेश ठाकूर, नागेश ठाकूर, सुहास ठाकूर, अजय जोशी, उदय जोशी, मारुती ठाकूर, अमृता शिंदे, अंकिता शिंदे, दिपाली ठाकूर, जान्हवी परब, प्राची परब, संज्योति जोशी, करिष्मा जोशी, नंदिता गव्हाणकर, मीनाक्षी जोशी, रश्मी जोशी, अनामिका ठाकूर, आरती ठाकूर, सुहासिनी नाईक, कल्पना ठाकूर आदी ग्रामस्थांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला.

प्रशासनाकडून रस्ता पक्का करण्याचे आश्वासन

कारवाई दरम्यान गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी ग्रामस्थांना आश्वस्त करत सांगितले की, प्रशासन नेहमीच सत्याच्या बाजूने उभे राहील. काहीवेळा कामास दिरंगाई होऊ शकते, मात्र चुकीची बाजू कधीही घेतली जाणार नाही. तसेच भविष्यात हा रस्ता पक्का करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT